मुंबई : इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून मराठा आरक्षण लागू करण्याचा आदेश निघेपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही, असा निर्धार करीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आझाद मैदानातील आपला मुक्काम वाढविला. आंदोलनावर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असतानाच आणखी एक दिवस आझाद मैदानात आंदोलन करण्यास सरकारने जरांगेंना परवानगी दिली.

जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाला शुक्रवारी सुरुवात झाली. उपोषणाला सुरुवात करतानाच जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. कोणी कितीही चिथवले तरी दगडफेक व जाळपोळ करू नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरातील वाहने हलविण्यासही त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले. आंदोलनाचे स्वरूप बघून मुदतवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी दुपारीच संकेत दिले होते. त्यानुसार संध्याकाळी पोलिसांनी जरांगेंना आणखी एक दिवस आंदोलनाची परवानगी देऊ केली. मात्र केवळ एक दिवसाची मुदतवाढ दिल्याबद्दल जरांगे यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा नापसंती व्यक्त केली.

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मुंबईत आले असल्याने आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील जनजीवन कोलमडले. आंदोलकांची गर्दी वाढल्याने फोर्ट, नरिमन पाॅईंट भागातील सर्व दुकाने, हाॅटेल बंद करण्यात आली होती. त्याचा समाचार घेताना जरांगे यांनी, सरकारने हॉटेल, चहा नाश्त्याच्या, वडापावच्या गाड्या बंद करून आंदोलकांची कोंडी केल्याचा आरोप केला. या आडमुठेपणामुळेच आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या चौकात घुसल्याचा दावा त्यांनी केला.

आंदोलक आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी जाणार नाहीत. मी बलिदान द्यायलाच आलो आहे. सरकारने आडमुठी भूमिका सोडून द्यावी, अन्यथा आंदोलकही आडमुठे वागतील. आरक्षण देण्यास विलंब लावल्यास ग्रामीण भागातील मराठा समाज मुंबईच्या कानाकोपऱ्यात घुसेल. सरकारने आंदोलकांना सहकार्य करावे. आंदोलकही सहकार्य करतील. – मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलक

आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. मात्र मराठे आणि ओबीसींना समोरासमोर आणून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला असून मराठा आंदोलनावर पोळी भाजणाऱ्यांचेच तोंड भाजेल. या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री