मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान परिसर आणि मुंबई महानगरपालिका मार्गावर मराठा आंदोलकांनी तुफान गर्दी केली आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदान परिसरात दाखल झाल्यानंतर मराठा आंदोलकांकडून जल्लोष करण्यात आला.

मराठा आंदोलक हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवे शेले घालून आझाद मैदान परिसरात जमले आहेत. विविध अटी आणि शर्तींसह मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र पाच हजारांहून अधिक आंदोलक जमले असून आझाद मैदान खचाखच भरले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व आझाद मैदान परिसर, मुंबई महानगरपालिका मार्ग, क्रॉफर्ड मार्केट – भेंडी बाजार, वाडी बंदर परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांच्या गर्दीसह त्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, तसेच ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे.

ठिकठिकाणी रस्ता रोधक उभारून गर्दीचे नियंत्रण करण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करीत आहेत. तसेच आझाद मैदानाकडे चालत जाण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. आझाद मैदानातील पाच हजार आंदोलकांची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आंदोलकांना आझाद मैदानाबाहेरच थांबविले जात आहे, मात्र मराठा आंदोलक आझाद मैदानात जाण्यावर ठाम आहेत. याप्रसंगी काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रस्ता अडविण्यासह बसगाड्या व इतर वाहने थांबविली आहेत. याप्रसंगी पोलिसांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र मराठा आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ सुरूच असल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.