मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबईतल मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून, मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

गणेशोत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. मात्र याच कालावधीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य आंदोलन व मोर्चाची हाक दिली आहे. आधीच गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, त्यात मराठा आंदोलकांचीही मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

‘सविस्तर चर्चा करावी’

  • मुंबईत गणेशोत्सवात मुंबईबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. गणेशोत्सवाचे दहा दिवस मुंबईतील रस्ते गर्दीने फुलतात. दरदिवशी सरासरी पाच लाख लोक मुंबईबाहेरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच दीड, पाच दिवसांचे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर गर्दी वाढत जाते. शेवटच्या दिवशीही गर्दी नऊ ते १० लाखांपर्यंत जाते.
  • गणेशोत्सव काळात आधीच वाहतूक कोंडी होत असते. उत्सवाच्या नंतरच्या पाच दिवसात गर्दीचा उच्चांक असतो. यंदा २९ ऑगस्टला म्हणजेच गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मराठा समाजाचा मोर्चा येणार असल्यामुळे गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. या संभाव्य गर्दीचा आधीच विचार करून सर्व यंत्रणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी गणेशोत्सव समितीने केली आहे.

मराठा आंदोलक मुंबईत आल्यास मोठी वाहतूक कोंडी, लोकल गाड्यांना गर्दी, रस्त्यांवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडे कार्यकर्ते व अन्य सुरक्षा व्यवस्था असते. मंडळांच्या परिसराची सुरक्षितता कार्यकर्ते पाहत असले तरी संपूर्ण मुंबईतच यानिमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चा करून मार्ग काढण्याची, नियोजन करण्याची आवश्यकता आहे. – ॲड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समिती