मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस दल शहरात तैनात असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाले. या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस अहोरात्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी संयम व दक्षता दाखवत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवली. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करताना आझाद मैदान येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांनी काळजी घेतली.

मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक आंदोलनासाठी शुक्रवारी आझाद मैदान येथे दाखल झाले. त्यावेळी दीड हजार पोलिसांची कुमक आंदोलनस्थळी तैनात करण्यात आली होती. त्यामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त, सहा उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक मिळून २०० अधिकारी, तसेच १,३०० कर्मचारी यांचा समावेश होता. मोर्चासाठी पोलिसांनी पाच हजार आंदोलनांची मर्यादा घातली होती, तसेच केवळ पाच वाहनांनाच मैदानात प्रवेश दिला. उर्वरित वाहने पोलिसांनी ठरवलेल्या जागीच उभी करण्याचे आदेश दिले होते. पण त्यानंतरही आझाद मैदान परिसरात राज्यभरातून आंदोलक येत होते. त्यांच्यासाठी जेवण घेऊन येणारी वाहने आझाद मैदाना परिसरात दाखल होत होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता.

सीएसएमटी जंक्शन व आसपासच्या भागाकडे जाणाऱ्या महापालिका मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच जे.जे. मार्गावरील वाहतूक एमआरए मार्ग पोलीस ठाण्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयाद्वारे मेट्रो सिनेमा जंक्शनकडे वळवण्यात आली होती. तसेच वाहतूक डी. एन. रोड (उत्तर दिशेची वाहतूक), फॅशन स्ट्रीटमार्गे मेट्रो सिनेमाकडे वळवण्यात आली होती. मंत्रालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तेथील मार्गिकाही बंद ठेवली होती. त्यातच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी परिसरात उभी असलेली आंदोलकांची वाहने हटवण्याची कारवाई सुरू केली. तसेच कोअर कमिटीच्या सदस्यांना नोटीस बजावली. उप आयुक्त प्रवीण मुंढे स्वतः मोठ्या फौजफाट्यासह महापालिका मुख्यालय आणि आझाद मैदानालगतच्या महापालिका मार्गावर तैनात होते. त्यांनी आंदोलकांना त्यांच्या गाड्या तातडीने हटवण्याचे आवाहन केले.

आंदोलकांनी सहकार्य करावे, अशी विनंती ते ध्वनीक्षेपकावरून करीत होते. मात्र आंदोलकांनी पोलिसांच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शवण्यास सुरूवात केली. त्यामुळे वातावरण बिघडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. पण अहोरात्र बंदोबस्तात तैनात पोलिसांनी याप्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना समजावत होते. यावेळी आंदोलकांनी आपल्या ट्रक आणि टेम्पोमध्ये अन्नपदार्थ, पाण्याचा साठा असल्याचे सांगून वाहने हलवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात वाद झाला. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त दंगल पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांना आंदोलकांनी घेराव घातला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयमी भूमिका घेत आंदोलकांना पर्यायी पार्किंगची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले. यासोबत काही वाहने नवी मुंबईकडे हलवण्याचीही विनंती करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातून ४०० किमीचा प्रवास करीत मुंबई गाठली असून त्यांनी अनिश्चितकालीन उपोषणाची घोषणा केली होती. त्यातच गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले. ते ‘लालबागचा राजा’ आणि विविध गणेश मंडळांना भेट देणार असल्याने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती. संपूर्ण मुंबईत गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी २० हजार हून अधिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस बल, दंगा नियंत्रण पथक, बॉम्ब पथक आणि केंद्रीय दलाची मदत घेण्यात आली होती. या काळात पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीतही सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांनी सर्व परिस्थिती संयमाने हाताळणी. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.