Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा आंदोलकांना आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांकडून केला जात आहे. आंदोलकांचे खाणेपिणे बंद केल्याचाही आरोप होत असून मनोज जरांगे यांनी सुविधा पुरविण्याचे काम मुंबई महानगरपालिकेचे आहे. मात्र हे काम ते पार पाडत नसल्याचाही आरोप केला आहे. पालिकेने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मागील दोन दिवसांपासून आंदोलकांसाठी फिरत्या शौचालयासह वैद्यकिय सेवेपर्यंतच्या सर्व सोयी पुरविण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात मराठा आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील प्रवाशांची कोंडी झाली आहे. तसेच, आंदोलकांनाही गैरसोयींचा फटका बसत आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या आंदोलकांना सोयी सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे. मात्र, असे असले तरीही पालिकेने मोफत शौचालये, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आदी नागरी सुविधा उपलब्ध केल्याचा दावा केला आहे. मात्र, आंदोलकांना पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे.
तसेच, नवी मुंबईतील मराठा समाजाने आंदोलकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे. तसेच, पालिकेने येथील खाद्यपदार्थांच्या दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचाही आरोप संतप्त आंदोलकांनी केला आहे. मात्र, महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे किंवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही रोखलेला नाही, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत. आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे ११ टँकर्स उपलब्ध केले असून अतिरिक्त टँकर्स मागविण्यात येत आहेत. आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. मैदनाच्या आतील एकूण २९ शौचकूप असणारे शौचालय, तसेच महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकुपे असलेली ३ फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. मेट्रोशेजारील १२ फिरती (पोर्टेबल) शौचालये तसेच फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून २५० शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरविण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.
अन्य सुविधा कोणत्या ?
सततच्या पावसामुळे आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर २ ट्रक खडी टाकून मार्ग समतल करण्यात आला आहे. आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे असून त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात केले आहेत. वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. तसेच, त्या ठिकाणी ४ वैद्यकीय पथक आणि २ रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. १०८ रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध असून आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र २ पथके कार्यरत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.