Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी आंदोलकांची गर्दी सतत वाढत आहे. मुंबईच्या विविध भागातून कार्यकर्त्याचे जथ्थेच्या जथ्थे आझाद मैदान परिसरात दाखल होत आहे. यामुळे आझाद मैदान कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले आहे. गर्दी वाढत असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानात निर्णायक आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका आणि आझाद मैदान परिसर गर्दीने फुलून गेले असून परिसर घोषणाबाजीने दुमदुमले आहे. आंदोलकांची गर्दी सतत वाढत आहे. आंदोलक मिळेल त्या मार्गाने आझाद मैदान परिसरात दाखल होत आहे.

‘कुठूनही घुसा, पण मुंबईत दिसा’

आंदोलनासाठी मराठा समाज आक्रमक झाले आहेत. ‘कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा’ अशी घोषणा दिली जात आहे. त्यामुळे अडचणीची पर्वा न करता आंदोलक मुंबईत येत आहेत. आता आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

‘मैदानात चिखल, चिखलात कार्यकर्ते’

आझाद मैदानात सर्वत्र पावसामुळे चिखल झाला आहे. कार्यकर्त्याना बसण्यासाठी काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिखलाची पर्वा न करता मैदानातच ठिय्या मांडला आहे. भर पावसात कार्यकर्ते उभे होते. अनेक कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर बसले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सेल्फी, छायाचित्रे आणि नृत्य

कार्यकर्ते ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत आहेत. अनेक जण सेल्फी आणि छायाचित्रे टिपत आहेत. अनेकांनी ढोल ताशे आणले असून रस्त्यात नृत्य करत असल्याचे दिसून आले.

सीएसएमटी स्थानकात प्रचंड गर्दी

हार्बर आणि मध्य रेल्वेतून हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात उतरत आहेत. त्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्रचंड गर्दी झाली आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस गर्दीचे नियोजन करीत आहेत.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि परिसरात येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात २ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ६ पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, २०० सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि १३०० पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे.