मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर (सीएसएमटी) गर्दी कायम आहे. बहुसंख्य आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरु असून हलगीच्या तालावर मनसोक्तपणे नाचण्याचा आनंदही लुटला जात आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकांनी विश्रांती व रात्रीच्या मुक्कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा आधार घेतला आहे. तसेच अनेकजण भुयारी मार्गावरही विश्रांती घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर गजबजाट पाहायला मिळत आहे. रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून अनेकजण दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकामधील गर्दी अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. अनेक मराठा आंदोलक मुंबईतील विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासह लालबाग – परळमधील गणेशोत्सव पाहण्यासाठी जात आहेत. त्यामुळे ट्रेनमध्येही मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबरोबरच स्थानकाच्या बाहेर व आझाद मैदान परिसरात गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाही लागल्या आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान आणि मुंबई महानगरपालिका मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.

विविध संघटनांकडून जेवणाचे वाटप

बहुसंख्य मराठा आंदोलकांनी जेवणाची स्वतःच व्यवस्था केली असून टेम्पोमधून स्वयंपाकाचे साहित्य, भांडी आणि महिनाभराचा शिधा आणला आहे. अनेकजण टेम्पोतच चहा, खिचडी रांधत आहेत. मात्र मुंबईतील विविध संघटना व काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून पाण्याच्या बाटल्या, खिचडी, फरसाण, केळी व बिस्कीटांच्या पुड्यांचे वाटप केले जात आहे.