CSMT Mumbai Police Traffic Advisory Mumbai: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. त्यातच गणपतीनंतर सोमवारी मोठ्याप्रमाणात चाकरमानी कामावर परतत आहेत. त्यामुळे सीएसटीएम परिसरातील वाहतुकीत मुंबई पोलिसांनी मोठ्याप्रमाणात बदल केला आहे.
सीएसएमटी जंक्शन व आसपासच्या भागाकडे जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडुन करण्यात आले आहे. याशिवाय जे.जे. मार्गावरील वाहतूक एमआरए मार्ग पोलिस ठाण्यापासून पोलिस आयुक्त कार्यालयाद्वारे मेट्रो सिनेमा जंक्शनकडे वळवण्यात आली आहे. तसचे पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक परिस्थितीनुसार जे.जे. मार्गाकडे वळवली जाऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत पोलिसांकडून योग्यत्या सूचना देण्यता येणार आहेत. तसेच डी.एन. रोड (उत्तर दिशेची वाहतूक) फॅशन स्ट्रीटमार्गे मेट्रो सिनेमाकडे वळवण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा येथून अतिरिक्त पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. वडाळा वाहतूक पोलिसांना ३५ तर आझाद मैदान पोलिसांना ३५ अशी ७० अतिरिक्त वाहतूक पोलीस देण्यात आले आहेत.
नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आंदोलकांना रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी आझाद मैदानात आंदोलन करावे, असे आवाहन केले आहे. मात्र मोठ्याप्रमाणात वाहने सीएमसएमटी परिसरात येत असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरू आहे. मोठ्याप्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झाले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करत आहेत.