मुंबई: मुंबईतील मराठा आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलकांनी सीएमएमटी स्थानक आणि स्थानकाबाहेर गोंधळ घातला. सोमवारी सकाळी मुंबईकरांची कार्यालय गाठण्यासाठी धावपळ असताना अनेक आंदोलक फलाटाच्या मधोमध येऊन हलगीच्या तालावर नाचत आहेत, ठिय्या मांडत आहेत. इतकेच नव्हे तर सरकारच्या निषेधार्थ सीएमएमटी येथे सराकरची प्रतिकात्मक अंतयात्राही काढण्यात आली. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर अभ्यास करत निषेध नोंदवला. कुणी रस्त्यावर कबड्डी खेळली. तर कुणी पोलिसांचे रस्तेरोधक हटवत त्यावर बसून तो ओढत नेताना दिसले. सीएसएमटीमधील या गोंधळाचा फटका मात्र प्रवाशांना बसताना दिसला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अशात सोमवारी कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकर प्रवाशांना सीएसएमटी स्थानकावर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. फलाटावर, स्थानक परिसरात आजही मराठा आंदोलकांची मोठी गर्दी असून फलाटावर मोठ्या संख्येने आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. आजही हलगीच्या तालावर स्थानक परिसरात मराठा आंदोलक थिरकत होते. काही आंदोलक फलाटाच्या मधोमध येऊन नाचत असल्याने सकाळच्या वेळेस कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना बरीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र होते. आंदोलनाचा चौथा दिवस असतानाही सरकारने आंदोलनाची दखल न घेतलेल्या आक्रमक मराठा आंदोलकांनी सीएसएमटी येथे चक्क सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली.
राज्य सरकारचा निषेध यावेळी आंदोलकांनी केला. तर दुसरीकडे आरक्षण नसल्याने स्पर्धा परिक्षेत चांगले गुण असूनही नोकर्या मिळत नसल्याचे म्हणत काही मराठा आंदोलक थेट रस्त्यावर अभ्यासासाठी बसले. पोलीस भरतीसह इतर भरतीचा अभ्यास करताना ही हे आंदोलक दिसले. आरक्षण मिळाले तर आम्हालाही सरकारी नोकर्या मिळतील, त्यामुळे सरकारने आमची मागणी मान्य करत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी भर रस्त्यात अभ्यासासाठी बसलेल्या मराठा आंदोलकांनी केली.
एकीकडे सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा, रस्त्यावर अभ्यास असे चित्र असताना दुसरीकडे मात्र काही आंदोलक कबड्डी आणि क्रिकेट खेळताना दिसले. बसून बसून काय करणार असे आंदोलकांनी रस्त्यावर कबड्डी आणि क्रिकेटचा डाव मांडला. त्याचवेळी काही आंदोलक तर थेट ताज हाॅटेलबाहेर गोंधळ घालताना दिसले. पाणी द्या, पाणी द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो असे म्हणत ताज हाॅटेलच्या बाहेर आंदोलक गोंधळ घालत होते. सीएसएमटी स्थानक परिसरादरम्यान पोलिसांनी मोठ्या संख्येने रस्तेरोधक लावले आहेत. पण या रस्तेरोधकाची गाडी करत अनेक आंदोलक खेळताना दिसले. आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही सीएसएमटी परिसरात गोंधळाचे वातावरण होते आणि त्याचा फटका मात्र मुंबईकरांना बसत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य मुंबईकरांकडून व्यक्त होत होती.
खाण्यापिण्याची सोय नसल्याने आंदोलक आक्रमक
आम्ही शांततेच आंदोलन करत आहोत, पण सरकारने आमचे खाणेपिणे बंद केले आहे. कुठेही खाण्यापिण्याची दुकाने सुरु नाहीत. तेव्हा आम्ही काय करायचे, त्यामुळे आम्ही सरकारच्या निषेधार्थ अनेक प्रकारे आंदोलन करत आहोत. त्यामुळेच हाॅटेलबाहेर जाऊन पाणी मागितले जात आहे तर सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली जात आहे. हा आमचा रोष आहे, सरकारने आमच्या मागणीकडे तात्काळ लक्ष द्यावे, आरक्षण द्यावे आम्ही गुलाल उधळून आपापल्या गावी जाऊ अशी प्रतिक्रिया बीडमधील एका आंदोलकाने दिली.
१० टन पेरू, ३०० डझन केळी
मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय करुन देण्यासाठी राज्यभरातून रसद येत आहे. भाकरी, चपाती, चटणी, लोणचे, ठेचा मुंबईबाहेरून येत असतानाच सोमवारी मराठा आंदोलकांना पेरू आणि केळी वाटपही केले जात होते. एका गावातून १० टन पेरू तर दुसर्या एका गावातून ३०० डझन केळी आणत त्याचे वाटप केले जात आहे.