मुंबई : गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाची चाहूल लागली आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर यंदा नवरात्रोत्सवालाही राजकीय दृष्टया खूप महत्त्व आले आहे. भारतीय जनता पक्षाने यंदाही मुंबईत विविध ठिकाणी मराठी दांडियाचे आयोजन केले आहे. मराठी बहुल भागात मराठी दांडीया आयोजित करून भाजपने यंदाही मराठी मतदारांना चुचकारले आहे. विक्रोळीतही असाच मराठी दांडिया आयोजित करण्यात आला असून मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्यांना रोज आयफोन देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाकडे जसे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे तसेच राजकीय पक्षांचेही या उत्सवाकडे लक्ष लागले आहे. सण आणि उत्सवांच्या माध्यमांतून मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय पक्ष साधतात. गेल्या काही वर्षांत भाजपने मराठी मतदारांना आपलेसे करण्यासाठी मराठी दांडियाचे आयोजन केले होते.

भारतीय जनता पार्टीच्यावतीने यंदा सलग चौथ्यावर्षी मराठी दांडियाचे आयोजन विक्रोळीत केले आहे. विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात हा मराठी दांडिया आयोजित केला आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज संध्याकाळी ७ वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार आहे.

मराठी दांडिया या उपक्रमाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून या मराठी दांडियाला मिळणारा वाढता प्रतिसाद बघून यंदा आम्ही विक्रोळीतील भव्य अशा छत्रपती संभाजी महाराज मैदान येथे मराठी दांडिया कार्यक्रम ठेवला आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यावेळी सादरीकरण करणार आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीतील व बॉलीवूडमधील सुप्रसिध्द कलाकारांची या कार्यक्रमात दररोज उपस्थिती असेल. या मराठी दांडियासाठी निःशुल्क प्रवेश देण्यात येईल.

रोज मराठमोळ्या वेशभूषेत उत्तम सादरीकरण करणाऱ्या तिघांना आयफोन असे एकूण पाच दिवसात १५ आयफोन, बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. दररोज जवळपास २५ हजार प्रेक्षक या दांडियात सहभागी होतील अशी अपेक्षा असून या दांडियाचे यु-ट्यूब वर थेट प्रक्षेपण प्रेक्षक बघू शकतील, अशी माहिती आमदार कोटेचा यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूर संकल्पनेवर दांडिया

यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष मिहीर कोटेचा यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सुप्रसिद्ध मराठी संगीतकार, गायक अवधूत गुप्ते, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. या भव्य मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या सर्वांनी केले.