मुंंबई : जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. मुंबई असो किंवा मेलबर्न- नाटकाच्या वेडाने झपाटलेली मराठी मंडळी सापडणारच. आतापर्यंत अनेक संस्था मराठी नाटकांचा प्रयोग करण्यासाठी अमेरिका, लंडन, दुबई, ऑस्ट्रेलियाला जात. आता ऑस्ट्रेलियातील ‘मेलबर्न इंडियन थिएटर’चे ‘बंदिनी’ हे नाटक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. २१ ते २४ जानेवारीदरम्यान पुण्यात आणि २५ ते २७ जानेवारीदरम्यान मुंबईत या नाटकाचे एकूण सात प्रयोग सादर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशात राहून नाटक सादर करणे आणि तेही मराठीत हे तसे कठीणच. पाच दिवस मान मोडून काम केल्यानंतर मिळणारे सुट्टीचे दोन दिवस कुटुंबाबरोबर व्यतीत करण्यात न घालवता नाटकाच्या तालमींमध्ये घालवणे, त्यासाठी कधी कधी दोन – अडीच तास गाडीने तालमींना येणे, आठवडाभरात रोज रात्री कार्यालयीन, घरची कामे संपवून ऑनलाइन नाटकाची चक्री तालीम करणे, अशी अनेक दिव्ये परदेशस्थ नाटकवेड्यांना नाटकाचा एखादा प्रयोग सादर करण्यासाठी करावी लागतात.

हेही वाचा – मिताली राज निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळण्याचे संकेत

अर्थात, अशांनाच ‘नाटकवेडे’ म्हटले जाते. या वेडातूनच ‘मेलबर्न इंडियन थिएटर’ या संस्थेचा जन्म झाला. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मराठी नाटकवेड्यांना हक्काचा नाट्यमंच उपलब्ध व्हावा म्हणून २०१८ साली ‘मेलबर्न इंडियन थिएटर’ या संस्थेची स्थापना रेश्मा परुळेकर, रश्मी घारे व निलेश गद्रे या तीन रंगकर्मींनी केली. प्रायोगिक नाट्यकृती सादर करणे आणि त्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा संस्थेचा मूळ उद्देश होता. पण त्याबरोबरच ऑस्ट्रेलियातील स्थानिक लेखकांकडून लिहिलेली नाटके सादर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यासाठी लेखकांची शिबिरे घेण्यात आली आणि त्यातून नवीन कलाकृती निर्माण झाल्या. या प्रयत्नांतूनच ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’, ‘द पपेट्स’, ‘उरिकृ मम गति’ या एकांकिका, ‘पंचायतन’ हे नृत्यनाट्य व ‘बंदिनी’, ‘फाइंडिंग निमो’ या नाटकांचे लेखन आणि निर्मिती झाली. ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या संगीत नाटकाचा रुपांतरित दिर्घांकदेखील सादर करण्यात आला.

या नाट्यप्रयत्नांना ऑस्ट्रेलियन मराठी व अमराठी नाट्यरसिकांनीही मनापासून दाद दिली. ऑस्ट्रेलियात बाळसे धरत असलेली ही नाट्यचळवळ आता भारतातील नाट्यरसिकांच्या भेटीला आली आहे. २१ ते २७ जानेवारीदरम्यान ‘बंदिनी’चे प्रयोग पुण्या-मुंबईत सादर करण्यासाठी!

हेही वाचा – पिंपरी : तब्बल २७ वर्षांनी सापडला मारेकरी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दापोडीत १९९५ ला केली होती पत्नीची हत्या

मेलबर्न इंडियन थिएटरचे हे रंगकर्मी मूळचे भारतातले. ऑस्ट्रेलिया ही त्यांची कर्मभूमी असली तरी भारत ही त्यांची मातृभूमी आहे. त्यामुळे ते करीत असलेले नाटक भारतातील रसिकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात, जेणेकरून त्यांची ही चळवळ अधिक दर्जेदार कलाकृती भविष्यात सादर करू शकेल यासाठी ते ‘बंदिनी’ हे नाटक घेऊन भारतात आले आहेत. या नाटकाचे ७ प्रयोग होणार आहेत. २१ ते २४ जानेवारीदरम्यान पुण्यात आणि २५ ते २७ जानेवारीदरम्यान मुंबईमध्ये. या प्रयोगाची तिकिटे ‘तिकीट खिडकी’ या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

या नाटकाचे अनेक प्रयोग मेलबर्न येथे सादर झाले असून नुकताच एक प्रयोग ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे सादर करण्यात आला. एका ओळीच्या वृत्तपत्रातील बातमीवर आधारित हे नाटक उत्कंठावर्धक व मनोरंजक तर आहेच, पण मूलगामी सामाजिक समस्येचा मागोवा घेणारेही आहे. ‘बंदिनी’ हे देवयानी देशपांडे नावाच्या प्रथितयश समाजसेविकेची गोष्ट कथन करणारे नाटक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi play bandini of melbourne indian theatre in australia has come on tour to maharashtra ssb
First published on: 18-01-2023 at 10:26 IST