पुणे : राज्यावर असलेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तमिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली आहे. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आद्रता वाढून पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात. सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिमालयाच्या पायथ्याचा भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्लीपासून संपूर्ण दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. पुढील चार-पाच दिवस ही तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ३८ ते ४० अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊन रात्रीही उकाडा जाणवू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे मंगळवारी ४२.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा ४० अंशांवर होता.