मुंबईत मराठी माणूस किती टक्के राहिलाय? यावर मुंबईत वेळोवेळी चर्चा होत असते. काही राजकीय नेतेमंडळी प्रत्येक वेळी इथे प्रत्येकाला येण्याचं, राहण्याचं, काम करण्याचं स्वातंत्र्य आहे या भूमिकेचं समर्थन करताना दिसतात. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत काही ठिकाणी काही इमारतींमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तींना घरं नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशीच एक तक्रार एका महिलेनं सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. हा प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी इमारतीतल्या संबंधित व्यक्तींना जाब विचारल्यावर या दोघांनी माफीही मागितली. पण नेमकं या महिलेसोबत काय घडलं होतं? याचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे.

नेमका प्रकार काय?

तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड वेस्टमधल्या ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही जागा देत नाही” असं सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बापलेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.

घडला प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली. त्यांनी मला त्या सोसायटीत बोलवून घेतलं आणि त्या दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी माफीही मागितली. आपण मनसे पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असं तृप्ती देवरुखकर यांनी नंतर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं.

आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल! “मराठी माणसाला मुंबईत घर नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार की दिल्लीश्वरांपुढे…?”

काय घडलं होतं तेव्हा?

तृप्ती देवरुखकर यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ आता समोर आला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात नेमकं या बाचाबाचीवेळी काय घडलं होतं ते दिसत आहे. संबंधित सेक्रेटरी व त्यांचे वडिल तृप्ती देवरुखकर यांच्यावर अरेरावी करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

“तुम्ही चुकीचं करत आहात. तुम्ही कुणाच्या परवानगीशिवाय व्हिडीओ काढू शकत नाहीत. मी अजून तुम्हाला नकार दिला का?” अशी विचारणा हे सेक्रेटरी करत असतानाच त्यांचे वयोवृद्ध वडिल संतापात तृप्ती देवरुखकर यांच्यावर अरेरावी करू लागले. “आम्ही महाराष्ट्रीय लोकांना घर देत नाही. तुम्ही काहीही म्हणणार का? आम्ही देत नाही महाराष्ट्रीयन लोकांना जागा. तुम्हाला जे करायचंय ते करा”, अशा शब्दांत त्यांनी तृप्ती देवरुखकर यांच्यावर अरेरावी केली. हे ऐकताच सेक्रेटरींनी त्यांना मागे केलं व ते बोलू लागले.

धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी अरेरावी, मग मोबाईल हिसकावून घेतला!

“तु्म्ही कुणाला विचारून हा नियम बनवला? नंतर तुम्ही तुमचे शब्द फिरवाल म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करतेय”, असं तृप्ती देवरुखकर त्यांना सांगत असतानाच सेक्रेटरींनी त्यांच्या हातातून मोबाईल खेचून घेतल्याचं व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालं आहे.