मुंबई : मंत्रालयात शिपायाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. हिम्मतराव निंबाळकर (४०) असे या आरोपीचे नाव असून तो फेब्रुवारी पासून फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला मागील वर्षी आमदार निवासातील उपहागृहामध्ये आरोपी हिम्मतराव निंबाळकर भेटला होता. मंत्रालयात कामाला असल्याचा दावा त्याने केला होता. यावेळी त्याने तक्रारदाराच्या भावाला साताऱ्यातील सत्र न्यायालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे तसेच टपाल विभागात आणखी एक नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होता.
दोन लाखांची फसवणूक
आरोपीने तक्रारदाराला बनावट नियुक्तीपत्रक दाखवले होेते. यानंतर पुढील प्रक्रियेसाठी २ लाखांची मागणी केली होती. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने सुरुवातीला २० हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे आणि नंतर १ लाख ८० हजार रुपये बँक हस्तांतरणाद्वारे दिले होते. मात्र नोकरी मिळाली नाही. त्याबाबत विचारणा केली असता निंबाळकर टाळाटाळ करत होता. तक्रारदाराला फसवणुकीचा संशय आल्यानंतर त्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत फेब्रुवारी महिन्यात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला होता.
फरार आरोपीला साताऱ्यातून अटक
तपासादरम्यान आरोपी साताऱ्यात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. त्याने स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांची फसवणूक केली, अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निंबाळकरने अशाच प्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू आहे.