मुंबई : मालाड येथील पिंपरीपाडा परिसरातील पठाणवाडीत शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीचे शनिवारीही तांडव सुरू होता. शनिवारी सकाळपासून अग्निशमन दलाचे मदतकार्य घटनास्थळी मदतकार्य सुरू होते. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मात्र, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जावान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. आगीची तीव्रता सातत्याने वाढत होती. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवताना अडचणींचा सामना करावा लागला. आगीची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच शनिवारी दुपारी १.०३ च्या सुमारास आगीला क्रमांक २ ची वर्दी देण्यात आली. ही आग विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा मोठा भडका उडाला. या आगीत स्टीलचे रॅक, लाकडी सामान, स्टीलचे कपाट, चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी वापरलेले जाणारे विविध सामान, प्लायवूडचा साठा, दुग्धव्यवसायाशी संबंधित विविध सामान, कार्यालयीन कागदपत्रे, वातानुकूलित यंत्रणा, पंखे, संगणक आदी विविध सामान जळून खाक झाले. या आगीत सुमारे १५ ते २० गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी अद्ययावत यंत्रांच्या साहाय्याने शनिवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास आग विझवली. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. अग्निशमन दलातर्फे या आगीची चौकशी करण्यात येत आहे.