मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करावर अंमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्याच्या अंतर्गत कारवाई करून अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारी अंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. त्यासाठी चालू अधिवेशनात कायद्यात सुधारणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
डॉ. परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता. राज्यात प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले असून, त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्तीही केली आहे. जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहे. यात गेल्या दोन-अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने आता राज्यस्तरीय आणि आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. सर्व राज्यांमध्ये गुप्त माहितीची देवाण – घेवाण सुरू असून, त्यामुळे तस्करांवर एकत्रितपणे कारवाई करणे शक्य झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमेवर विशेष उपाययोजना
एकनाथ खडसे यांनी धुळे आणि जळगाव अंमली पदार्थांचे केंद्र बनला आहे. मध्य प्रदेशातून दररोज अंमली पदार्थ राज्यात येत आहेत. मुक्ताताई नगरमध्ये राजरोस धंदा सुरू आहे, असा मुद्दा उपस्थित केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमेवर धुळे, जळगाव जिल्ह्यांत विशेष उपाययोजना केल्या जातील. गांजाच्या शेतीवर देशात सर्वत्र बंदी आहे. पण, उत्तर भारतात भांग या पेयावर बंदी नाही. त्यामुळे सीमेवर अंमली पदार्थांचा काही प्रमाणात अवैध व्यापार चालतो. त्यामुळे अंमली पदार्थांसह गांजा, गुटखा किंवा तत्सम पदार्थांची तस्करी रोखली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.