मुंबई : गुन्हे शाखेने जोगेश्वरी परिसरात केलेल्या कारवाईत दोन किलो मेफेड्रोनसह (एमडी) दोन तस्करांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत चार कोटी रुपये असून दोन्ही आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अमली पदार्थ कुठून आणले, तसेच ते कोणला देण्यासाठी मुंबईत आणले याचा गुन्हे शाखा तपास करीत आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष-५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनःश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला अमली पदार्थ तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कक्ष-५ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बेंडाळे, न्यायनिर्गुणे, पोलीस हवालदार तानाजी पाटील, अविनाश चिलप, इक्बाल सिंग, वायंगणकर, पोलीस शिपाई पाटील, मुलानी, काळे, सावंत यांचे पथक जोगेश्वरी परिसरात पाठवण्यात आले. जोगेश्वरी बस थांब्यासमोर उत्तर वाहिनीवर दोन संशयीत व्यक्ती पथकाला आढळल्या.
पथकाने संशयावरून दोघांनाही ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याकडे भुकटी सापडली. तपासणी केली असता ते एमडी असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत आरोपींकडून दोन किलो एमडी जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत चार कोटी रुपये आहे. अब्दुल करीम नाझीर शेख (४४) व यासीन अली शेख (२९) अशी अटक आरोपीची नावे आहेत. दोघांविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमडीची सर्वाधिक विक्री
गेल्या दोन वर्षांत नाशिक, सोलापूर, नालासोपारा, सांगली, कोल्हापूरमध्ये व उत्तर प्रदेशात एमडी निर्मिती करणारा प्रत्येक एक कारखाना आणि गुजरातमधील दोन कारखाने अशा एकूण आठ कारखान्यांवर छापे टाकून ते टाळेबंद करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये १० कोटी रुपय किंमतीचे एमडी जप्त केले होते.
२०१९ मध्ये तीन कोटी, २०२० मध्ये पाच कोटी २१ लाख, २०२१ मध्ये ३२ कोटी २९ लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले आहे. मुंबई पोलिसांनी २०२४ मध्ये ४५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे एमडी जप्त केले होते. एमडी साधारण २००० नंतर वितरित होऊ लागला. सुरुवातीला त्याला अमली पदार्थ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. प्रतिबंधित नसल्यामुळे राजरोसपणे त्याची निर्मिती व विक्री केली जात होती. त्याचा प्रभाव कोकेनसारखाच असतो. मात्र कोकेनपेक्षा एमडीची किंमत तुलनेने कमी आहे. तसेच एमडीच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. त्यामुळे एमडीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.