मुंबई : गेल्या आठवड्यात मुंबई शहर, तसेच उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईतील तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या काहिलीने मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबईत रविवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर ठाणे भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर भारतातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असताना अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबई, पुणे परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान, आता पुन्हा हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह पालघर जिल्ह्यात रविवारी हलक्या सरी, तर ठाणे परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही भागात तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. वातावरणातील उष्णतेत वाढ होत आहे. यामुळे असह्य उकाडा सोसावा लागत आहे. मुंबईत अधूनमधून ढगाळ वातावरण, तर मधूनच कडक ऊन पडत आहे. गेल्या आठवड्यात पाऊस, तर आता उन्हाचा चटका वाढू लागल्याने नागरिकांना ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा >>>मुंबई: ‘सर्वांसाठी पाणी धोरणा’अंतर्गत साडेतीन हजार अर्ज मंजूर

दरम्यान, मुंबईसह राज्यातील इतर भागातही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. दरम्यान, मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास साधारणपणे ८ ऑक्टोबरपासून सुरू होतो. मात्र मागील काही वर्षे यामध्ये सातत्याने बदल होत आहे. मुंबईत २०२२ मध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास २३ ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता, तर २०२१ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी मोसमी वारे परतले. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार मुंबईमधून सर्वात उशिरा म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२० रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.