मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून पुन्हा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

विजांसह जोरदार वारे मेघगर्जनेसह राज्यात सध्या पाऊस पडत आहे. काही भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. यातच पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत गुरुवारपर्यंत नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.

किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली तीव्र होणार आहे. परिणामी शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस सुरु असल्यामुळे या भागात अतिवृष्टीची नोंद होत आहे. पावसामुळे या भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावरही पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. पाऊस सुरू असला तरी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे. काही भागात कमाल तापमानाचा पारा ३० अंशापार आहे. वर्धा येथे मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. साधारण शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील सर्व जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हे दोन्ही दिवस राज्यात ढगाळ हवामान राहील तसेच अनेक भागात पावसाचा अंदाज आहे.

मुंबईची स्थिती काय

मुंबईसह ठाणे पालघर भागात बुधवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. मुंबईत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल तापमानाचा पारा चढा होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २८.६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत मंगळवारी फारसा पाऊस पडलेला नाही. पावसाची रिपरिप सुरू होती.

पावसाचा अंदाज कुठे अतिमुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, लातूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली</p>

मेघगर्जनेसह पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर, नाशिक

मराठवाड्यात पावसाचा जोर

मराठवाड्यात रविवारपासून पाऊस जोर कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात मागील दोन दिवस सर्वाधिक पाऊस पडला आहे. यामुळे अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.बीड जिल्ह्यातील शिरूर व अन्य काही तालुक्यातही पावसाचा जोर अधिक होता.

गेल्या २४ तासांत झालेला पाऊस (सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३०) जिल्हानिहाय

(बीड जिल्हा)

पाटोदा- ७० मिमी

गेवराई – ६६ मिमी

वडवणी- ६७ मिमी

(जळगाव)

पाचोरा -१३९ मिमी

भडगांव- १३९ मिमी

चाळीसगाव- ६६ मिमी

(लातूर)

जळकोट – ४१ मिमी

लातूर – ४३ मिमी

(अहिल्या नगर)

पाथर्डी – १२७ मिमी

शेवगाव- १६० मिमी

(छत्रपती संभाजीनगर)

वैजापूर – ७६ मिमी

पैठण – ९१ मिमी

(रायगड)

कर्जत – ४३.३ मिमी

पनवेल – २५.८ मिमी

माथेरान – ५९.४ मिमी

श्रीवर्धन – २५ मिमी

धुळे – ६८ मिमी