मुंबई : हवामान विभागाने मुंबईत मंगळवारी हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामान विभागाने सोमवारी वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी पहाटेपासून उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जाग येऊन अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. मात्र, त्यानंतर लगेच पाऊस ओसरला. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत जून आणि जुलैमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात व्यक्त केलेले अंदाज सातत्याने चुकीचे ठरत आहेत.
यंदा मुंबईत मोसमी पाऊस दरवर्षीपेक्षा लवकर दाखल झाला. मात्र, त्यानंतर जून महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीसही पावसाचा जोर कमी होता. शहरात अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली. गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला होता. त्यानंतर या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार मुंबईत सोमवारपासून पुढील तीन ते चार दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, हवामान विभागाचे अंदाज खोटा ठरवून सोमवार आणि मंगळवारीही पाऊस पडला. मुंबई शहर तसेच उपनगरांत मंगळवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती.
अनेक सखल भागात पाणी साचले होते. सकाळी नऊच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला. तरीदेखील हवामान विभागाकडून कोणताही सुधारीत अंदाज देण्यात आला नव्हता. त्यानंतर दुपारी १२ः३० नंतर हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. हवामान विभगाने अतिमुसळधार पावसाचा इशारा देताच काही वेळात मुंबईत पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत मंगळवारी हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र मुंबईत पावसाचा जोर होता.
दरम्यान, आता मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत हवामान विभाग प्रमुखांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकलेला नाही.
पावसाचा जोर का वाढला
मध्य प्रदेशात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि समुद्रातील तसेच किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वाढलेला वेग यामुळे मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. त्याचबरोबर पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता.
इशारा देताच पाऊस नाहीसा
हवामान विभागाने मंगळवारी साधारण १२ः३०च्या सुमारास सुधारीत इशारा जाहीर केला. त्यापूर्वी मुंबईसह इतर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत होता. सुधारीत अंदाज जाहीर केल्यानंतर काही वेळातच मुंबईत पावसाचा जोर ओसरला.
रायगड रत्नागिरीत पूरपरिस्थिती
रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला. अनेक भागात पाणी साचले होते. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने सकाळी अकराच्या दरम्यान धोका पातळी ओलांडली होती. त्याचबरोबर सावित्री नदी आणि अंबा नदी या इशारा पातळीपर्यंत पोहोचली होती.
मुंबईत मंगळवारी सकाळी ८ ते २ पर्यंत झालेला पाऊस
सांताक्रूझ | १०१ मिमी |
जुहू | ९२ मिमी |
विक्रोळी | ९१.५ मिमी |
जोगेश्वरी | ९० मिमी |
वाशी | ९६ मिमी |
वांद्रे – कुर्ला संकुल | ४७ मिमी |
वर्सोवा | ४६ मिमी |
विलेपार्ले | ४५ मिमी |
कुर्ला | ४३ मिमी |
चेंबूर | ४९ मिमी |