मुंबई : मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण झाल्यानंत आता लवकरच ठाणेकरांचेही मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. डिसेंबरमध्ये मेट्रो ४ आणि ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आहे. त्यानुसार या टप्प्याच्या संचलनासाठी सप्टेंबरपासून मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना (ट्रायल रन) सुरुवात केली जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीला एमएमआरडीएने वेग दिला आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेवरील रुळांवर मेट्रो गाड्यांचे डब्बे चढविण्यास एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे. तर इतर कामांनाही वेग देण्यात आला आहे.
एमएमआरडीएकडून मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे. त्यातील मेट्रो ४ मार्गिका वडाळा ते कासारवडवली अशी असून या मार्गिकेची लांबी ३२.३२ किलोमीटर आहे. या मार्गिकेचा विस्तार मेट्रो ४ अ मार्गिकच्या माध्यमातून केला जात असून ४ अ मार्गिका कसारवडवली ते गायमुख अशी २.७ किमी लांबीची आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार डिसेंबरपर्यंत ४ आणि ४ अ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा १०.५ किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे या १० किमीच्या टप्प्याच्या कामाला एमएमआरडीएने वेग दिला आहे. या टप्प्यात १० मेट्रो स्थानकांचा समावेश असून त्यांच्या कामालाही वेग देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये या टप्प्यातील विविध यंत्रणांची आणि मेट्रो गाड्यांची चाचणी एमएमआरडीएकडून सुरु केली जाणार आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीला एमएमआरडीकडून वेग देण्यात आला आहे. मेट्रो गाड्यांची चाचणी सुरु करण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो गाड्यांचे डबे या टप्प्यातील स्थानकांवर क्रेनच्या माध्यमातून ठेवण्यास सुरुवात झाली आहे. काही डबे रुळावर ठेवण्यात आले आहेत तर काही येत्या एक-दोन दिवसात रुळावर ठेवले जाणार आहेत. त्यानंतर त्यांची जोडणी करत मेट्रो गाड्यांच्या चाचणीस सुरुवात केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये चाचणीला सुरुवात होणार आहे. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून, सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत डिसेंबरपर्यंत कॅडबरी जंक्शन ते गायमुख टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या १० स्थानकांवर डिसेंबरपासून धावणार मेट्रो
कॅडबरी जंक्शन, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवानिवाडा, गायमुख.