मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज, तसेच ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार होती. मात्र मुंबई मंडळाने अखेरच्या क्षणी सोमवारी सायंकाळी अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरत अर्ज दाखल करण्याची मुदत एका दिवसाने (२४ तास) वाढवली आहे.
त्यामुळे आता इच्छुकांना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर मंगळवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यात येणार आहे. दरम्यान आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी बँकेच्या कार्यालयीन वेळेदरम्यान अनामत रक्कम भरून अर्ज सादर करता येतील.
मुंबईतील ४,०८२ घरांसाठी २२ मेपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कारणाने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून सोमवार, १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता अर्ज भरण्याची आणि रात्री ११.५९ वाजता ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत संपणार होती. तर आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपणार आहे. अनेकांना दाखले उपलब्ध होण्यास काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जमा अर्जाची संख्या एक लाखाहून अधिक
अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम जमा करून अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी मोठय़ा संख्येने अर्ज भरले. त्यामुळेच इच्छुकांनी भरलेल्या अर्जाची संख्या सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत १ लाख ३६ हजार ३५० वर पोहचली. आता २४ तासांची मुदतवाढ दिल्याने यात आणखी वाढ होईल. तर अनामत रक्कमेसह आतापर्यंत एक लाख ९ हजार २३४ अर्ज सादर झाले आहेत. यातही आता आणखी वाढ होईल.