मुंबई : फोर्ट येथील कावसजी पटेल स्ट्रीट मार्गावरील पुनर्रचित इमारतीत मूळ रहिवाशांच्या ११ व्यापारी गाळ्यांमध्ये घुसखोरी झाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’चे (म्हाडा) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या सदनिकांची जबाबदारी पाहणाऱ्या कंत्राटदारानेच घुसखोरी केल्याची गंभीर बाबही उघड झाली आहे. यापैकी नऊ गाळे म्हाडाने ताब्यात घेतले आहेत तर उर्वरित दोन गाळ्यांबाबत न्यायालयात खटला सुरु आहे.

पूर्वाश्रमीच्या ‘लखानी टेरेस टेनन्ट असोसिएशन’ या इमारतीत प्रामुख्याने ३१ व्यापारी गाळ्यांचा समावेश होता. १०० ते २०० चौरस फुटाचे हे छोटे गाळे होते. यापैकी ११ व्यापारी गाळ्यांमध्ये घुसखोरी झाल्याची बाब उघड झाली आहे. पुनर्रचित इमारतीतील रिक्त गाळ्यांच्या चाव्या कार्यकारी अभियंत्यांनी ताब्यात घ्याव्यात व मूळ रहिवाशांना गाळे वितरीत करावेत, अशी पद्धत असते. अशा गाळ्यांवर नजर ठेवण्यासाठी म्हाडाने विजय वधवानी या कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. परंतु या कंत्राटदारानेच या गाळ्यांमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला जात आहे.

११ मूळ गाळेधारकांपैकी पैकी टी. जी. जटमल आणि अबु बाकर मख्खीजान या मूळ रहिवाशांना ताबा पत्र जारी करण्यात आले तेव्हा संबंधित गाळ्यात घुसखोरी झाल्याची बाब निदर्शनास आले. त्यामुळे पुनर्रचित गाळ्यांची जबाबदारी असलेल्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी संबंधित गाळे ताब्यात घेण्यात आदेश तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. त्यांनी कारवाई करुन गाळे ताब्यातही घेऊन सील केले होते. परंतु या सील केलेल्या गाळ्यातच घुसखोरी झाल्याचे निदर्शनास आले. अशा ११ गाळ्यांमध्ये घुसखोरी झाल्याचे स्पष्ट झाले. आता म्हाडाकडून पुन्हा कारवाई करुन या ११ पैकी नऊ गाळे ताब्यात घेण्यात आले आहेत. उर्वरित दोन गाळ्यांबाबत न्यायालयात खटला सुरु असल्यामुळे ते ताब्यात घेण्यात आलेले नाहीत. या घुसखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या प्रकरणी केलेल्या चौकशीत, या इमारतीतील दोन व्यापारी गाळ्यात कंत्राटदार वाधवानी यांच्या पत्नी मोनिका आणि मुलगा नीरज वाधवानी यांच्या नावे बनावट ताबा पावती बनवून घुसखोरी केल्याचा म्हाडाचा दावा आहे. या प्रकरणी शहर व दिवाणी न्यायालयात खटला सुरु आहे. संबंधित ताबा पावती बनावट असून त्यावर आपली सही नसल्याचे ए विभागाचे तत्कालीन उपअभियंता सुनील शेळके यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

घुसखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले गाळे मूळ रहिवाशांना सुपूर्द केले जातील – संजीव जायस्वाल, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी.