लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्य सरकारला गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाचा विसर पडला असून सरकारला जागं करण्यासाठी येत्या १० दिवसांमध्ये गिरण गावात गिरणी कामगार अचानक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा दिवंगत गिरणी कामगार नेते दत्ता इस्वालकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित श्रद्धांजली सभेमध्ये गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला.
गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे दिवंगत कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त गिरणी कामगार संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी परळ येथील संघटनेच्या कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासाठी सुरू असलेला संघर्ष आणि दत्ता इस्वलकर यांचे चळवळीतील योगदानाला उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. सरकारला आता गिरणी कामगारांचा विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागं करण्यासाठी गिरण गावात अचानक आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात ५०० ते ६०० गिरणी कामगार सहभागी होतील, असा इशारा गिरणी कामगार संघर्ष समितीने दिला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सरकारने गिरणी कामगारांच्या घराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या संदर्भात सुनील राणे यांची भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.