मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे कोकणवासीयांना होणारा त्रास सर्वश्रुत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हतबलता व्यक्त केलेली पाहायला मिळाली. इतकंच नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुंबई गोवा महामार्गाची तुलना रामायणाशी करून रस्त्याच्या कामातील दिरंगाईवर टीका केली. आता तर मनसेने आक्रमक पवित्रा घेत पदयात्रेचा निर्णय घेतला. अशातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडूनही मुंबई-गोवा महामार्गाची वारंवार पाहणी होत आहे. आता मंगळवारी (१२ सप्टेंबर) मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. हा त्यांचा पाचवा पाहणी दौरा आहे. त्यामुळे इतक्या वर्षांपासून दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती खरंच सुधारणार का अशी चर्चा होत आहे.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याला पनवेल विश्रामगृह येथून सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मागील काही दिवसांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेवर एकीकडे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण वारंवार या रस्त्याची पाहणी करत आहेत. अशातच चव्हाण पाचव्यांदा या रस्त्याची पाहणी करणार आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

रवींद्र चव्हाण यांनी आधी केलेले कोकण रस्ता पाहणी दौरे

पहिला दौरा – २६ ऑगस्ट

दुसरा दौरा – १५ ऑगस्ट

तिसरा दौरा – ५ ऑगस्ट

चौथा दौरा – १४ जुलै

दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या पनवेल येथील सभेत रस्ते सूधारण्यासाठी करा सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. मुंबई गोवा महामार्गावरी खड्ड्यांच्या निमित्ताने राज ठाकरे कोकणीवासियांना साद घालत असल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा : विश्लेषण : मुंबई गोवा महामार्गाचे काम ‘मार्गी’ लागणार तरी कधी?

मंत्री रविंद्र चव्हाण यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीय मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिकेने जातील यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी सरकारी अधिकारी व रस्ता बांधणाऱ्या ठेकेदारांवर दबाव वाढवीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनसे आक्रमक झाल्याने मंत्री चव्हाण यांनी मनसेच्या भूमिकेविरोधात पत्र काढून श्रेयजीवी म्हणून मनसेच्या पवित्र्याला हिनवले होते. मनसेने यापूर्वी अमित ठाकरे हे मुंबई गोवा महामार्गावर पदयात्रा काढतील असे जाहीर केले. मात्र ही पदयात्रा पुढे ढकलून मनसेचे मुंबई,ठाणेसह राज्यातील नेते या पदयात्रेत सामिल करुन पदयात्रा रायगड व रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित केली होती.