मुंबई : अल्पवयीन मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरूणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली. या अत्याचारामुळे पीडित मुलगी जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी ३६ वर्षीय आईसोबत उपनगर परिसरात राहते. तिच्या आईच्याच तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई एका कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आरोपी व त्याची प्रेयसी त्यांच्या कंपनीत कामाला आहेत. तक्रारदार महिला पतीपासून वेगळी राहते. दोन्ही आरोपीही तिच्यासोबत राहत होते.
तक्रारीनुसार, पीडित मुलीची आई कामानिमित्त १४ मे ते १५ जून या कालावधीत घराबाहेर गेली असताना आरोपी व त्याच्या २१ वर्षीय प्रेयसीने १० वर्षांच्या पीडित मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. आरोपीने अनेक वेळा पीडित मुलीवर अत्याचार केला. यावेळी त्याने स्क्रूड्रायवरचा वापर केला. यावेळी २१ वर्षीय आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे पीडित मुलीला जखमा झाल्या आहेत. आरोपी पीडित मुलीला मारहाणही करीत होता. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची, तसेच तिचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यामुळे भीतीने पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. पण आरोपी नेहमी त्रास देऊ लागल्यामुळे तिने आईला याबाबत सांगितले.
त्यानंतर आरोपीने मेघवाडी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींचा मोबाइल तपासला असता ते नियमित अश्लील चित्रफीत पाहत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी अटकेपूर्वी मोबाइलमधील बराचसा डेटा डिलीट केला आहे. त्यामुळे मोबाइल संच न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. आम्ही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊ तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
दोघांनाही विशेष न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६४ (२) (आय), ६४ (२), ७७, ११५, ३५२, ३५१ (३) व पोक्सो कायदा कलम ४,६, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याचे ६६ (ई) व ६७ (ब) कलमही लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.