मुंबई : पावसाळ्यात सुरक्षिततेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि मेट्रो सेवेचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) ‘मेट्रो २ ए’ आणि ‘७’ या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि एमएमएमओसीएलचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एमएमएमओसीएलने सादर केलेल्या या व्यापक पावसाळी सज्जता आराखड्यात तांत्रिक तपासणी, वाढीव फेऱ्या आणि कार्यस्थळी अवलंब करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा समावेश आहे.
प्रत्यक्ष कार्यस्थळावरील तयारी अधिक भक्कम करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे पार पडतील याची खातरजमा हे अधिकारी करतील. खड्डे भरण्यासाठीची वाहने आणि पाणी उपसण्यासाठीचे पंप महत्त्वाच्या ठिकाणी अगोदरच तैनात करण्यात आले आहेत. तसेच, पावसाळ्यात पादचारी व वाहनांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांभोवती ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले असून सुरक्षितता आणि सुरळीत सेवेची खात्री करण्यात आली आहे. प्रगत पावसाळी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून या कक्षात थेट लाइव्ह मॉनिटरिंगची सुविधा आहे आणि हा कक्ष मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडण्यात आला आहे. आपत्कालीन मदतीसाठी २४ तास हेल्पलाइन क्रमांक १८००८८९०५०५ / ०८०८ आणि ८४५२९०५४३४ उपलब्ध आहेत.
‘संपूर्ण पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मेट्रो सेवा अनुभवता येण्यासाठी विविध प्रणालींची तपासणी करण्यापासून ते स्थानकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यापर्यंत सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थिती उद््भवली, तर दोन्ही मार्गिकांवर तत्काळ सेवेत आणता येतील अशा राखीव मेट्रो गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसातही मेट्रो नियंत्रित वेगाने सुरळीत चालू राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे’, असे डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
‘महामुंबई मेट्रो’तर्फे पावसाळ्यातील महत्त्वाच्या उपाययोजना
‘मेट्रो २ ए’ आणि ‘७’ या मार्गिकांवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी ॲनिमोमीटर’ बसविण्यात आले असून हवामानाची सद्यस्थिती सतत तपासून निर्णय क्षमता अधिक सक्षम करण्यात आली आहे.
पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी आणि प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी मेट्रो सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
प्रत्येक मेट्रो स्थानकात किमान ६४ हाय-डेफिनिशन सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षा आणि देखरेख करण्यासाठी २४ तास नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र आपत्कालीन कोच सज्ज ठेवण्यात आला आहे.
डीजी सेट्स, यूपीएस यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, अर्थिंग सिस्टीम्स व डीवॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून ३० स्थानके व चारकोप डेपो येथे ही साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
सर्वच्या सर्व ३४ मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली असून मुसळधार पावसातही गळती होणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक असेल, हे सुनिश्चित केले आहे.
संपूर्ण ३५ किमी लांबीच्या व्हायाडक्टची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये रूफ गटर्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि ३० स्थानकांवरील ड्रेनेज लाइन यांचा समावेश आहे.
३४ स्विचगियर युनिट्समध्ये २५ केव्ही केबल्स (तीन रिसिव्हिंग सबस्टेशन्सपासून फीडिंग पोस्टपर्यंत), ट्रान्सफॉर्मर बुशिंग्ज, सीटी, पीटी, लाइटनिंग अरेस्टर्स, न्यूट्रल आयसोलेटर आणि हीटर यांसह ७५९ हून अधिक इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्सची प्रतिबंधात्मक देखभाल व तपासणी पूर्ण करून संपूर्ण यंत्रणेमधील विद्युत सुरक्षेची खात्री करण्यात आली आहे.