दुरुस्तीचा वाद मिटल्यास सोडतीचा मार्ग मोकळा होणार

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीसाठी राखीव असलेल्या रांजनोळी येथील १,२४४ घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (‘एमएमआरडीए’) गिरणी कामगारांना दिले आहे. हा प्रश्न सुटल्यास म्हाडाच्या मुंबई मंडळाने गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवलेल्या २,५२१ घरांच्या सोडतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल.

‘एमएमआरडीए’ने गिरणी कामगारांसाठी रांजनोळीतील १,२४४, रायचूरमधील १,०१९ आणि कोल्हे येथील २५८ अशी एकूण २,५२१ घरे म्हाडाला सोडतीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. मात्र रांजनोळीमधील १,२४४ घरांची प्रचंड दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या घरांची दुरुस्ती करावी आणि मगच सोडत काढावी अशी मागणी गिरणी कामगार कृती समितीने केली आहे. या घरांच्या विक्रीतून ‘एमएमआरडीए’ला महसूल मिळणार असल्याने दुरुस्तीची जाबाबदारी त्यांचीच असल्याचा दावा करीत म्हाडाने दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एमएमआरडीएने ही जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर ढकलली आहे. महानगरपालिकेने करोनाकाळात या घरांचा वापर अलगीकरणासाठी केला होता. त्यामुळेच या घरांची दूरवस्था झाली असून महानगरपालिकेने या घरांची दुरुस्ती करावी, असे ‘एमएमआरडीए’चे म्हणणे आहे. ‘एमएमआरडीए’ यासंदर्भात सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र महानगरपालिकेने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या वादात सोडत रखडली आहे.

हेही वाचा >>>पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ास मान्यता; गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी गिरणी कामगार कृती समितीने मंगळवार, २३ मे रोजी ‘एमएमआरडीए’च्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाची हाक दिली होती. मात्र त्याआधीच ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त – १ के. एच. गोविंदाराज आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन गोविंदराज यांनी दिले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती कृती समितीचे प्रवीण येरूणकर यांनी दिली. ‘एमएमआरडीए’ने घरांच्या दुरुस्तीचा प्रश्न सोडविल्यास सोडतीचा मार्ग मोकळा होईल आणि २५२१ गिरणी कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.

रांजनोळी येथील घरांच्या दुरुस्ती संदर्भात नुकतीच एक बैठक झाली असून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल. -के. एच. गोविंदाराज , अतिरिक्त महानगर आयुक्त-१