मुंबई : पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर – ठाणे दरम्यानच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ३२० झाडे कापण्यात येणार असून ३८६ झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे. स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमींनी मात्र या वृक्षतोडीला आणि पुनर्रोपनाला विरोध केला आहे. पूर्व मुक्त मार्गावरील हिरवळ नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तर ॲड. सागर देवरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महानगर आयुक्त यांना कायदेशीर नोटीस बजावून हा वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
घाटकोपर – ठाणे प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणाअंतर्गत १३ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारीकरणाच्या कामाला एमएमआरडीएकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ३२० झाडे कापावी, तर ३८६ झाडांचे पुनर्रोपन करावे लागणार आहे. ही वृक्षतोड आणि पुनर्रोपणासाठी एमएमआरडीएने पालिकेच्या उद्यान विभागाकडून आवश्यक ती परवानगी मिळवली आहे. त्यामुळे लवकरच पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडे हटवण्यात येणार आहेत. पण मुलुंड, विक्रोळीमधील स्थानिक रहिवाशांना याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
प्रयास सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त आणि महानगर आयुक्त यांनी कायदेशीर नोटीस पाठवून ही वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर हिरवळ असून त्याचा विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड परिसराला फायदा होतो. पण ही हिरवळ नष्ट केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल. त्यामुळे वृक्षतोड न करता प्रकल्प कसा राबवता येईल याचा विचार एमएमआरडीएने करावा आणि वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी या नोटीसीद्वारे करण्यात आली आहे. याबाबत येत्या काही दिवसात एमएमआरडीएकडून प्रतिसाद न मिळाल्यास याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘वनशक्ति’चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी या वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत वृक्षतोड सुरूच आहे. तर झाडांचे पुनर्रोपण मुंबईत कुठेही यशस्वी झालेले नाही. असे असताना पुनर्रोपण नाव देत झाडांची एकाप्रकारे मोठ्या प्रमाणावर कत्तलच सुरू आहे. त्यामुळे किती ठिकाणी आणि किती प्रकल्पातील वृक्षतोडीला विरोध करायचा अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
