१५ दिवसांत खड्डे बुजवणार, महापालिकेच्या आश्वासनानंतर मनसे नगरसेवकांनी जामीन स्वीकारला

शनिवारी रात्री संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती.

मुंबईतील खड्ड्यांसाठी आंदोलन केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी सोमवारी जामीन स्वीकारला आहे. महापालिकेने १५ दिवसांत खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्यानंतर या दोघांनीही जामीन स्वीकारला आहे.

मुंबईतील खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त झाले असून यावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी महापालिकेचे मुख्य अभियंते दराडे यांच्या हाती ‘खड्ड्यांची जबबदारी माझीच’ असा फलक देत छायाचित्रे टिपली. यामुळे पालिकेतील ४,२०० अभियंत्यांनी सामुहिक राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले. अभियंत्यांच्या वाढत्या दबावानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटक करण्याचे आदेश थेट मंत्रालयातून देण्यात आले होते.

शनिवारी रात्री संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे पोलिसांसमोर हजर झाले आणि खड्डे बुजवल्याशिवाय जामीन स्वीकारणार नाही अशी भूमिका या दोघांनी घेतली होती. त्यामुळे या दोघांची रवानगी शेवटी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सोमवारी दुपारी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीत महापालिकेने १५ दिवसांत खड्डे बुजवण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर या दोन्ही नगरसेवकांनी जामीन स्वीकारला. दरम्यान, खड्ड्यांवरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाला आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये मात्र पावसामुळे खडी पुन्हा उकरली जात असल्याने पाऊस पडल्यास पुन्हा खड्डे पडतील, अशी भीतीही अधिका-यांनी वर्तवली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns corporator sandeep deshpande and santosh dhuri accepted bail