मुंबई: दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने करीत आहेत. मात्र ही गुंतवणूक आहे कोठे, पाच लाख कोटींचे उद्योग कुठे गेले, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केला. शिवसेनेने (ठाकरे) प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याच्या घोषणेची खिल्ली उडवताना राज्यात आज शिवाजी महाराजांच्या मंदिराची नव्हे तर चांगल्या विद्यामंदिरांची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने ‘आम्ही हे करू’ या मथळ्यात आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी अन्य पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात आम्ही हे करू एवढेच आश्वासन दिले आहे. मात्र आम्ही काय करू आणि कसे करू या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले. २०१४ मध्ये आपण राज्याच्या सर्वांगीण विकासाचा सर्वंकष आराखडा (ब्लू प्रिंट) प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात २०१४ च्या आराखड्यातील अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला असून या योजना प्रकल्प कसे मार्गी लागू शकतील याची उपाययोजनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – भाजपच्या लेखी शेतकरी, विद्यार्थी शहरी नक्षलवादी! आदित्य ठाकरे यांची टीका

वचननाम्यात काय?

  • ट्रेन, बस अथवा अन्य कुठल्याही वाहनांनी परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तींची राज्याच्या सीमेवर चौकशी केली जाईल. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना त्यांची इथे राहण्याची सोय आणि किती काळ राहणार याची खातरजमा केली जाईल.
  • ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबई आय उभारणे, लोणार सरोवर येथे जैवविविधता संशोधन केंद्र, प्रत्येक जिल्ह्यात उद्योगधंद्यांचे जाळे, राज्याला उद्योग राज्य म्हणून विशेष दर्जा, राज्याचे स्वतंत्र रेल्वे मंडळ, केवळ पोलीस परवानगीवरच मराठी, हिन्दी चित्रपटांच्या चित्रीकरणाची मुभा यांसह घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जगातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारण्याचे आश्वासन.
  • जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा आणि जीवनमान, महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगारावर भर देण्यात आला असून दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे.