राज्यात ज्या प्रकारे भाजपा आणि शिवसेना यांच्यात कायमस्वरूपी सुंदोपसुंदी सुरू आहे, त्याचप्रमाणे मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषत: मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना या दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपताच रविवारी सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी “वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा”, असा मेसेज पोस्ट केला आहे. त्यामुळे नेमकं या ट्वीटमागचं गणित काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

संदीप देशपांडेंनी आपल्या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप देशपांडे मुंबईतील मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. “भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. त्यामुळे आता मनसेकडून कोणत्या नगरसेवकावर निशाणा साधला जाणार आणि कुणाचा तसेच कोणता भ्रष्टाचार बाहेर काढला जाणार, याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपा, शिवसेना, मनसे या तिन्ही पक्षासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून देखील पालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे.