मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोसमी पावसाने २४ मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर २९ जून रोजी त्याने संपूर्ण देश व्यापला होता.साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला त्यानंतरच्या कालावधीत देशात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.

राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरण्याची सर्वसाधारण नियोजित तारीख १७ सप्टेंबर असते. त्यानुसार यंदा तो तीन दिवस लवकरच मोसमी वारे परतण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा परतीचा प्रवास साधारणतः दहा ते पंधरा दिवसांनी होतो. त्यानुसार महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसांत राजस्थानाच्या आणखी काही भागांसह गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीचा परतीचा प्रवास

२३ सप्टेंबर – दक्षिण राजस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू
५ ऑक्टोबर- महाराष्ट्रातून (नंदुरबार)
१५ ऑक्टोबर- संपूर्ण देशातून माघार

ऑगस्ट अखेर अधिक पावसाची नोंद

१९७१ ते २०२० कालावधीत दीर्घकालीन सरासरीनुसार सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी १६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ऑगस्ट महिनाअखेर देशात ७ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात तब्बल २६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात पावसाची शक्यता

मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होत असतानाच सध्या विदर्भावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने कोकण किनारपट्टी विदर्भात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यात पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत शनिवारपासून हजेरी लावली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात शनिवारी मध्यरात्री पावसाचा जोर होता. त्याचबरोबर रविवारीही काही भागात पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.