मुंबई : तब्बल २२ दिवसांपासून प्रवास मंदावलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर आगेकूच केली आहे. सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात सोमवारी मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली. दरम्यान, सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे.
गेल्या १६ वर्षांचा विक्रम मोडीत काढत मोसमी वारे यंदा लवकर म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाले. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातही मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली. केरळच्या बहुतेक भागासह उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत मोसमी वारे धडकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ मे रोजी मोसमी पावसाचे राज्यात म्हणजेच, देवगड तसेच कर्नाटक आणि संपूर्ण गोव्यात आगमन झाले. लगेचच दुसऱ्या दिवशी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला. त्यानंतर मात्र मोसमी वाऱ्यांचा प्रवास मंदावला होता.
मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली होती. तब्बल २२ दिवसांनी मोसमी वाऱ्यांनी वाटचाल सुरू केली आहे. मोसमी पावसाने आज संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापला असून विदर्भाच्या काही भागात प्रगती केली आहे. याचबरोबर सौराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागात मोसमी पावसाने प्रगती केली आहे. दरम्यान, अजूनही मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. विदर्भातील काही भागात मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला. अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे लवकर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि लगेचच सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत १० जूननंतर पावसाला सुरुवात होते.
नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करून १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये तो १० जून रोजी पोहोचतो.
मोसमी पाऊस दाखल म्हणजे काय ?
भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाला सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते.
गेल्या वर्षीही लवकरच…
गेल्या वर्षी मोसमी पाऊस मुंबईत ९ जून रोजी दाखल झाला होता. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा एक – दोन दिवस आधी पाऊस आला होता. २०२३ मध्ये उशिरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१ मध्ये ९ जून, तर २०२० मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता.
यंदा सरासरीपेक्षा जास्त
संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नाही. हिंदी महासागरीय द्विध्रुविताही तटस्थ आहे. डिसेंबर – मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.