मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरातून ४० मजली इमारतीतील ५०० चौरस फुटांच्या घरात ५५६ कुटूंबे एक-एक करत राहावयास येत आहेत. हक्काच्या मोठ्या घराचा ताबा मिळाल्याने रहिवासी आनंदी आहेत. पण आता या नव्या घराचा अनेकांना ताप होऊ लागला आहे. पुनर्वसित इमारतीच्या परिसरात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे.
अनेक रहिवासी हिवताप, तापाने आजारी पडले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता रहिवाशांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत मुंबई मंडळाने मुंबई महानगरपालिकेला कीटकनाशक फवारणी करण्यासंबंधी पत्र पाठवले आहे. त्यानुसार लवकरच पालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत वरळी बीडीडी येथील दोन पुनर्वसित इमारतींचे काम पूर्ण झाले असून या इमारतीतील घरांचा ताबा देणे सुरू आहे. ताबा घेतलेले काही कुटुंब नव्या घरात रहावयास आले आहेत. मात्र सध्या या रहिवाशांना येथे एका वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या इमारतीच्या आसपास काम सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती येथील एक रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. मागील दोन दिवसांपासून आपल्याला ताप आहे, तर एक महिला रुग्णालयात दाखल आहे. आणखी काही जणांनाही ताप आल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचेही या रहिवाशाने सांगितले.
रहिवाशांच्या या तक्रारीची दखल घेत मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याने मुंबई महानगरपालिकेच्या जी – दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून कीटकनाशकांची फवारणी करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार पालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. तर मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला. या परिसरात कीटकनाशक फवारणी आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.