मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर महावितरणकडून इंधन समायोजन आकारात वाढ करण्यात आली असून घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही त्याचा फटका बसणार आहे. महागडी वीजखरेदी केल्याचा खर्च वसूल करण्यासाठी एक महिन्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचा दावा महावितरणकडून करण्यात येत आहे. मात्र महागड्या वीजखरेदीचे वाढलेले प्रमाण आणि महावितरणची बिकट आर्थिक स्थिती पाहता इंधन समायोजन आकारातील वाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

महावितरणने राज्य वीज नियामक आयोगापुढे आगामी पाच वर्षातील वीजदरांचा फेरप्रस्ताव सादर करुन वीजेचे दर कमी केल्याचा दावा केला होता आणि जुलैपासून नवीन दर लागू झाले होते. महावितरणने वास्तविक दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी करुन अन्य ग्राहकांचे मात्र वाढविले होते. पुढील पाच वर्षात स्वस्त सौर ऊर्जेची उपलब्धता वाढल्यावर टप्प्याटप्प्याने हे दर कमी होणार आहेत. मात्र आता नवीन दर लागू झाल्यावर काही काळातच महागड्या वीजखरेदीपोटी इंधन समायोजन आकाराचा भार ग्राहकांवर लादण्यात आला आहे.

या माध्यमातून प्रति युनिट ९५ पैशांपर्यंत दरवाढच केली आहे. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांकडून प्रति युनिट ३५ पैसे, ३०० युनिटपर्यंत वापर असलेल्यांकडून ६५ पैसे, ३०१ ते ५०० युनिट वीज वापर करणाऱ्यांकडून ८५ पैसे तर ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापर असलेल्यांकडून ९५ पैसे इंधन समायोजन आकार वसूल करण्यात येणार आहे.

राज्यातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक वीजग्राहकांचे वीज दर कमी होतील, असे दावे महावितरण व राज्य सरकारकडून करण्यात आले होते. मात्र नवीन वीजदर लागू होताच काही महिन्यांतच इंधन समायोजन आकार वाढवून वेगळ्या माध्यमातून दरवाढ करण्याची पाळी महावितरणवर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदत अजून पोचलेली नाही आणि शेतकऱ्यांना पिकाची नुकसानभरपाई मिळालेली नाही. या परिस्थितीत घरगुती ग्राहकांसह सर्वच वीजग्राहकांवर इंधन समायोजन आकाराचा भार लादून वीजदरवाढ करण्यात आली आहे. महावितरणने यासंदर्भात एक ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले असून सप्टेंबर महिन्याच्या बिलामध्ये हा आकार वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना ऐन दिवाळीत वाढलेल्या वीजबिलांचा झटका बसणार आहे.