मुंबई : शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वाहतुकीसाठी प्रभादेवी पूल बंद करत केला. त्यामुळे या मार्गावरील राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसच्या मार्गात बदल केला आहे. बदललेल्या मार्गात एसटीचा प्रवास काही किमीने वाढणार असल्याने, एसटीच्या तिकीट दरात वाढ होईल. मुंबई-पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये-जा करणाऱ्या साध्या, सेमी, शिवशाही बसच्या तिकीटात वाढ होईल. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावे लागेल.

वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत परळ व प्रभादेवी परिसरातील पूर्व-पश्चिमेला जोडणारा प्रभादेवी येथील जुना पूल पाडला जाणार आहे. त्याजागी नवीन पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाईल. प्रभादेवी पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करून या मार्गावरील वाहतूक सेवा इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग वाहनधारकांसाठी उपलब्ध केले आहेत.

एसटी महामंडळाच्या परळ आगारातून दादर येथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या साध्या, सेमी आणि शिवशाही बसच्या मार्गात बदल केला आहे. एसटीची बस मडके बुवा चौकातून (परळ टी.टी. जंक्शन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने, कृष्ण नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन, भारत माता जंक्शन, संत जगनाडे चौक येथे उजवे वळण घेऊन साने गुरूजी मार्गाने चिंचपोकळी पुलावरून कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौकातून (चिंचपोकळी जंक्शन) उजवीकडे एन.एम. जोशी मार्गाने एसटीच्या परळ आगारात येतील व त्याच मार्गाने परत जातील. बदललेल्या मार्गामुळे साधारण ६ किलोमिटर अंतर वाढत आहे. त्यामुळे तिकीट दरात वाढ होईल, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून मिळाली.

शिवनेरीच्या मार्गात बदल

विद्युत शिवनेरी व शिवनेरी बससाठी दादर ते परळ, दादर टी.टी सर्कल, टिळक पूल, कबुतर खाना येथून उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोड शारदाश्रम, गोपीनाथ चव्हाण चौककडून डावीकडे वळण घेऊन परळ बस स्थानकात जातील. या बदलामुळे दादर ते परळ हे अंतर ०.४ किमीने वाढेल. परळ ते दादर येताना बाबुराव परुळेकर मार्गावरून डावीकडे वळण घेऊन भवानी शंकर मार्गे उजवीकडे वळण घेऊन कबुतरखाना येथून दादर टी.टी. सर्कलमार्गे दादर शिवनेरी बस स्थानक येथे जातील. या मार्ग बदलामुळे ०.९ किमीने वाढ होईल. विद्युत शिवनेरी व शिवनेरी बसचे प्रवासाचे अंतर दादर ते परळ २.६ किमी व परळ ते दादर ३.१ किमी इतकी प्रवास वाढ होईल. त्यामुळे या दोन्ही बसच्या तिकीट दरात वाढ होणार आहे.