मागील अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटलेला नाही. त्यामुळे आता एसटी महामंडाळाने प्रवाशांना एसटी सेवा मिळावी हा हेतू असल्याचं सांगत मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार महामंडळ चालक म्हणून ७५० खासगी चालकांना कामावर दाखल करून घेत आहे. याशिवाय महामंडळाने कामावर हजर न होणाऱ्या आणि संपावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. याचीही आकडेवारी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः माध्यमांसमोर ठेवली. तसेच बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असं नमूद करत संपावर ठाम असणाऱ्या कामगारांना इशारा दिलाय.

शेखर चन्ने म्हणाले, “एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही. ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे.”

आतापर्यंत ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त

एसटी कामगारांवरील कारवाईची माहिती देताना ते म्हणाले, “संप सुरू झाला तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झालेत. साधारणतः या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत.”

बडतर्फ कर्मचाऱ्यांना वापसीचा काही मार्ग आहे का? शेखर चन्ने म्हणाले…

पत्रकारांनी संपादरम्यान बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या पुन्हा वापसीचा काही मार्ग आहे का असा प्रश्न विचारला. यावर शेखर चन्ने यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, असं म्हणत गंभीर इशारा दिलाय.

हेही वाचा : “एसटी कामगारांना चारवेळा संधी दिली, त्यामुळे आता…” कारवाईबाबत परिवहन मंत्री अनिल परबांचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितलं होतं की बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचं आवाहन आहे की अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये. त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी रूजू व्हावं. बरेचश्या कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे,” असं शेखर चन्ने यांनी नमूद केलं.