मुंबई : मुलुंडमधील मिठागराच्या जागेवर अपात्र धारावीकरांसाठी घरे बांधण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. मात्र मुलुंडकरांचा त्याला विरोध आहे. हाच विरोध सोमवारी मुलुंडमध्ये पुन्हा एकदा अनोख्या जाहिरात फलकाद्वारे दिसला. मुलुंडच्या आमदारांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतची भूमिका काय आहे हे सांगताना गांधीजींच्या तीन माकडांचे चित्र झळकवण्यात आले आहे. काही बोलत नाही, काही ऐकत नाही काही दिसत नाही, अशी अवस्था असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे. धारावीतील लोक येथे रहायला आल्यानंतर आवाज उठवणार का असा प्रश्नही या फलकाद्वारे विचारण्यात आला आहे. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचे भांडूप, विक्रोळी आणि मुलुंडमधील मिठागराच्या जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. मुलुंडमधील ५८ एकर मिठागराची जागाही यासाठी देण्यात आली आहे. त्याविरोधात मुलुंडमधील अॅड सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली. अॅड देवरे त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तर दुसरीकडे मुलुंडकरांनीही मिठागराच्या जागेवर धारावीकरांसाठी घरे बांधू न देण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत लवकरच आंदोलन तीव्र केले जाणार आहे.
मात्र त्याचवेळी मुलुंडकर स्थानिक आमदारांच्या भूमिकेवरुन नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसते आहे. निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी, नेत्यांनी मुलुंडची एक इंचही जागा धारावी पुनर्वसनासाठी जाऊ देणार नाही असे आश्वासन मुलुंडकरांना दिले होते. मात्र निवडून आल्यानंतर आमदार धारावी पुनर्वसनाबाबत एक शब्दही काढत नाहीत. मुलुंडची जागा मिठागरासाठी दिल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही असे म्हणत मुलुंड परिसरात काही फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर एक जागरुक मुलुंडकर असे लिहिले आहे. त्यामुळे हे फलक नेमके कोणी लावले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र हे फलक नागरिकांकडूनच लावण्यात आल्याची चर्चा आहे.
धारावी पुनर्वसनाबाबत आमदारांची भूमिका काही दिसत नाही, काही बोलत नाही, काही ऐकत नाही अशी असल्याचे या फलकातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धारावीची लोक येथे रहायला आल्यावर आवाज उठवणार का असा प्रश्नही याद्वारे विचारण्यात आला आहे. आमदारांची भूमिका स्पष्ट नसल्याने मुलुंडकर संभ्रमात असून नाराजही आहेत. तेव्हा मुलुंडकरांच्या प्रश्नांना आमदारांनी उत्तर द्यावे, आपली भूमिका स्पष्ट करावी असे मुलुंडकरांचे म्हणणे आहे. याविषयी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण अधिवेशनात असल्याने बोलता येणार नसल्याचे सांगितले.