मुंबई : कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून महानगरपालिकेने मुंबईत चार ठिकाणी कबुतरखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात मुलुंड, अंधेरी, बोरिवलीसह वरळीतील ठिकाणाचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणाला नागरिकांकडून विरोध होत आहे. नुकतेच आता मुलुंडनंतर वरळीतील ठिकाणालाही समाजमाध्यमांवरून विरोध होऊ लागला आहे. वरळी जलाशयाऐवजी प्रशासनाने लोढा पार्क या ठिकाणी कबुतरखाना सुरू करावा, तसेच, कबुतरांसह, घार आणि गिधाडांनाही त्यांचे खाद्य द्यायला सुरुवात करावी, अशी उपहासात्मक टीका समाजमाध्यमावरून होऊ लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबुतर व कबुतरखान्यांचा वाद चर्चेत आला आहे. कबुतरांची पिसे व विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने मुंबईतील कबुतरखाने बंद केले. मात्र, त्यांनतर जैन समाजाने ठराविक वेळेत कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. तसेच, याबाबत न्यायालयातही धाव घेण्यात आली होती. त्यांनतर कबुतरांना ठराविक वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याबाबतच्या तीन अर्जांवर पालिकेने नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या. त्यानुसार आता मुंबईत चार ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास परवानगी देण्यात आली. जी – दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर), अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर, मुलुंड येथील खाडीकडील परिसर आणि बोरिवलीतील गोराई मैदान या ठिकाणांचा त्यात समावेश आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत मराठी एकीकरण समितीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत या ठिकाणांना विरोध केला होता. तसेच, मुलुंड परिसरात तात्पुरता कबुतरखाना सुरू करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता.
सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी महापालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. याबाबत त्यांनी पालिकेला पत्र पाठवले होते. त्यांनतर वरळीतही तात्पुरता कबुतरखाना सुरू करण्यास आता विरोध होऊ लागला आहे. वरळीत मोठ्या प्रमाणात कोळी बांधव वास्तव्यास असून त्यांच्याकडूनही विरोध होत आहे. ज्यावेळी वरळी जलाशयाच्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकले जातील, त्यावेळी तिथे सुकी मासळी, सुकट टाकावेत, असे आवाहन स्थानिकांकडून केले जात आहे. तसेच, प्रशासनाने लोढा पार्क, कफ परेड अशा ठिकाणी कबुतरखाने सुरू करून दाखवावे, विशिष्ठ समाजातील नागरिकांना माशांचा वास आवडत नाही. मग कबुतरांची घाण आम्ही का सोसावी, असेही मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
कबुतरांना सकाळी ७ ते ९ या वेळेत खाद्य टाकण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. मात्र, या दोन तासांच्या कालावधीतच १० किलो धान्य टाकल्यास काय परिणाम होईल, त्यावर पालिकेने काही ठोस नियम केले आहेत का, त्यांच्यावर काय कारवाई होणार, असे प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहेत.
