मुंबई : आरे वसाहतीत तब्बल सहा वर्षांनंतर स्लेटी-लेग्ड क्रेक या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. आरेमध्ये २०१८ नंतर आता प्रथमच याची नोंद झाली असून, आरेला जंगल घोषित केल्यानंतर ही पहिलीच नोंद आहे. आरेमध्ये २०१८ मध्ये जखमी स्लेटी-लेग्ड क्रेकला जीवदान दिल्याची नोंद आहे. त्यानंतर २०२१ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात नर, मादी आणि दोन पिल्लांचे निरीक्षण बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) नोंदवले होते.
जुलै महिन्यात वन्यजीव छायाचित्रकार महेश यादव, अभिनेता सुयश टिळक आणि कौशल दुबे, इम्रान उदत हे आरे जंगलात फिरत असताना त्यांना एका पक्ष्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज त्यांनी रेकॉर्ड केला. काही वेळातच एक लहान पक्षी झाडाच्या फांदीवर विश्रांती घेत असल्याचे दिसून आले. आरेमध्ये स्लेटी-लेग्ज क्रेक पाहणे हे केवळ पक्षी निरीक्षकांसाठीच खास नाही तर माझ्यासाठी देखील एक महत्त्वाची बाब असल्याचे वन्यजीव छायाचित्रकार महेश यादव यांनी सांगितले. दरम्यान, सपाट पायाचा क्रेक सुमारे २५ सेमी लांब असतो. त्याचे शरीर चपटे असते. त्यामुळे त्याला झाडाच्या खालच्या भागातून सहज जाता येते. त्याची बोटे लांब आणि शेपटी लहान असते. त्याची पाठ तपकिरी, छातीची बाजू, पोट आणि शेपटीवर काळे-पांढरे डाग समाविष्ट असतात.
घशाकडील भाग पांढरा असतो, चोच पिवळसर असते आणि पाय हिरवे असतात. हे पक्षी चिखलात किंवा उथळ पाण्यात त्यांच्या चोचीने अन्न शोधतात. ते शक्यतो कोरड्या जागी किंवा झुडपांची दाटी जिथे कमी असेल तिथे घरटे बांधतात. स्लेटी-लेग्ड क्रेक एकावेळेस ४ ते ८ अंडी घालतात. दक्षिण भारतातील केरळमधील निलंबूर येथे केलेल्या एका अभ्यासातून या पक्ष्यांचा उष्मायन कालावधी सुमारे २० दिवसांचा असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, या प्रजातीचा जून ते सप्टेंबर हा कालावधी प्रजननाचा काळ असतो. या हंगामात ते शहरातील विविध भागात अचानक आढळून येण्याची शक्यता असते. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तीन पिल्लांसह एक जोडी वारंवार रस्त्यांवरून जाताना पाहिल्याचे निरिक्षण नोंदविले आहे.
गेल्या १० वर्षांत ८ वेळा नोंद
प्रथम आरेत २०१६ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या पक्ष्याची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा आरेत २०१८ मध्ये जखमी स्लेटी-लेग्ड क्रेकला जीवदान दिले होते. आयआयटी मुंबईच्या आवारात २०२० मध्ये, त्यानंतर २०२१ मध्ये तीन ठिकाणी दर्शन झाले होते. यात १ बीएनएचएस सीईसी येथे तर २ आयआयटी मुंबई परिसरात. त्यानंतर पुन्हा २०२२ मध्ये बीएनएचएस सीईसी येथे नोंद झाली असून आता आरेत पुन्हा एकदा हा पक्षी दिसला आहे.
अधिवास
भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेपासून फिलीपिन्स आणि इंडोनेशियापर्यंत दक्षिण आशियातील चांगल्या जंगली देशात दलदली आणि तत्स क्षेत्र हे त्यांचे निवासस्थान आहे. हिवाळ्यात ते दक्षिणेकडे स्थलांतरित होतात.