मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकासासाठी निविदा सादर करण्याची सोमवारी अंतिम मुदत असताना निविदा प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदेला दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असून आता इच्छुक कंपन्यांना ११ ऑगस्टपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. मुदतवाढीमुळे पुनर्विकास पुन्हा लांबणीवर पडला आहे.

अंदाजे ३३ एकर जागेवरील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीतील ४८ इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया २००० सालापासून सुरु आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष पुनर्विकास मार्गी लागलेला नाही. २०१२ मध्ये या वसाहतीचा समूह पुनर्विकास हाती घेण्यात आला. मात्र काही कारणाने पुन्हा पुनर्विकास रखडला. शेवटी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोतीलाल नगरच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) ची अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करत पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये निविदा मागविण्यात आल्या आहे. या निविदेला सात वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा रद्द करून दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आली. मात्र त्या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली.

परिणामी पुनर्विकास लांबणीवर पडला. विकासकांना ३४५० रहिवाशांना ६३५ चौ. फुटाची घरे देणे परवडत नसल्याने निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हाडाकडून राज्य सरकारला सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने अखेर ६२० चौ. फुटाची घरे देत निविदा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने निविदा काढण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळापत्रकानुसार १५ जुलैपर्यंत निविदा सादर करण्याची तारीख असतानाच मुंबई मंडळाने निविदेला २८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. आता सोमवारी ही मुदत संपत असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा दोन आठवड्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आता ११ ऑगस्टपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. दरम्यान इच्छुक कंपन्यांचे निविदेबाबत काही प्रश्न असल्याने त्यानुसार त्या प्रश्नांचे निराकरण करत त्यांना निविदा सादर करता यावी यासाठी वेळ दिल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. ऑक्टोबर २०२४ पासून निविदा प्रक्रियेतच हा प्रकल्प अडकल्याने अभ्युदयनगरमधील ३४५० रहिवाशांचे पुनर्विकासाचे स्वप्न लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे.