मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामधील भुयारीकरणाला लवकरच गती येणार आहे. भुयारीकरणासाठी आवश्यक असलेले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) मुंबईत दाखल होऊन प्रकल्पास्थळी बसविण्यात येतील. त्यानंतर पुढील महिन्यापासून भुयारीकरणाचे काम वेगात सुरू होईल. सध्या दोन टीबीएम मशीन चीनवरून मुंबईत दाखल होणार आहेत.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) द्वारे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ५०८ किमी लांबीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील वांद्रे -कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत स्वरूपात बांधला जात आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाट्यापर्यंत २१ किमीचा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग मेथड (एनएटीएम) अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्याचे नियोजन आहे.
तसेच २१ किमी बोगद्यापैकी ७ किमी लांबीचा बोगदा ठाणे खाडीत तयार केला जाईल. घणसोली ते शीळफाटा दरम्यानचा सुमारे पाच किमी अंतराचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने (एनएटीएम) तयार केला. तर, या प्रकल्पातील घणसोली ते वांद्रे-कुर्ला संकुल पर्यंत बोगदा खोदण्याचे काम टीबीएममार्फत करण्यात येईल. या कामासाठी चीनमधून टीबीएम मागविल्या आहेत.
आसामवरून क्रेन दाखल होणार
चिपोल झिओनगन जहाज ७ सप्टेंबर रोजी चीनमधील नान्सा बंदरातून निघाले. तर, २३ सप्टेंबर रोजी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे पोहोचण्याची शक्यता आहे. दोन्ही टीबीएमच्या सुट्ट्या भागाचे वजन अंदाजे ५,२०० मेट्रिक टन आहे. जेएनपीटी येथे सीमाशुल्क मंजुरी आणि प्रकल्पास्थळी वाहतूक करण्यासाठी सुमारे १० दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी टीबीएम प्रकल्पास्थळी दाखल होतील. ३ आणि ५ ऑक्टोबर रोजी शाफ्ट २, शाफ्ट ३ मध्ये टीबीएम तैनात करण्यात येतील. टीबीएम दोन्ही शाफ्टमध्ये नेण्यासाठी ७५० मेट्रिक टनच्या क्रेनचा वापर केला जाईल. ही क्रेन आसामहून मागविण्यात आली आहे.
सर्वात खोल बोगदा पारसिक डोंगराखाली
वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाट्यापर्यंत २१ किमीचा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. बोगद्याच्या १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाणार आणि उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरली जाईल. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असणार आहे. त्याचा सर्वात खोल भाग शीळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटर जमिनीखाली असणार आहे.