मुंबई:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण आज, बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त होणार असून आता डिसेंबरपासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होणार आहे. तर महामुंबईत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार असल्याने मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणार्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. अशावेळी मुंबई विमानतळावरुन नवी मुंबई विमानतळापर्यंत अतिजलद पोहचता यावे यासाठी या दोन्ही विमानतळांना थेट मेट्रोने जोडले जाणार आहे. ३४.८९ किमी लांबीच्या मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिकेद्वारे या दोन्ही विमानतळापर्यंतचा प्रवास अतिजलद, अवघ्या ४५ मिनिटांत होणार आहे.
सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सिडकोकडून सुरु आहे. या मार्गिकेचा सविस्तर आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून येत्या काही दिवसांतच या आराखड्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ही मान्यता मिळाल्यास पुढील कार्यवाही करत सिडकोकडून ही मार्गिका मार्गी लावली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमीच्या आणि १४ मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पात मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. मागील काही वर्षांपासून ही मार्गिका मार्गी लावण्याच्यादृष्टीने एमएमआरडीए आणि सिडकोकडून कार्यवाही सुरु होती. सिडकोच्या हद्दीत सिडकोकडून तर मुंबईच्या हद्दीत एमएमआरडीएकडून मेट्रो ८ मार्गिकेची उभारणी केली जाणार होती. मात्र शेवटी राज्य सरकारने ही मार्गिका सार्वजनिक-खासगी सहभागातून मार्गी लावण्याचा निर्णय घेत सिडकोकडे प्रकल्पाची जबाबदारी दिली. त्यानुसार आता सिडकोने हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या मार्गिकेचा आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला असून लवकरच या आराखड्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या आराखड्याचे पुनरावलोकनही केले जाणार असून त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आराखड्यात काही बदल गरजेचे असल्यास तसे बदल करत ही मार्गिका मार्गी लावली जाणार आहे. दरम्यान राज्य सरकारच्या मान्यतेनंतर आराखड्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मेट्रो ८ मार्गिका उन्नत आणि भुयारी अशा स्वरुपाची असणार आहे. तर या मार्गिकेचे संचलन सुरु झाल्यास मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर ३० ते ४० मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र ही मार्गिका कार्यान्वित होण्यासाठी काही वर्षांची प्रतीक्षा आहे. कारण काम सुरु होण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा असून काम सुरु झाल्यानंतर ही मार्गिका पूर्ण होण्यास किमान सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.
अशी आहे मेट्रो ८ मार्गिका
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ मार्गिका ३४.८९ किमी लांबीची असून या मार्गिकेसाठी अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका उन्नत आणि भुयारी अशी असणार असून यात स्थानके असणार आहेत. २० स्थानकांपैकी ६ स्थानके भुयारी तर १४ स्थानके उन्नत असणार आहेत.
स्थानकांची नावे अशी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ (भुयारी), फोनिक्स मिल (भुयारी), एस जी बर्वे मार्ग (भुयारी), कुर्ला (भुयारी), लोकमान्य टीळक टर्मिनस (भुयारी), गरोडीया नगर (भुयारी),बैंगणवाडी (उन्नत), मानखुर्द (उन्नत), आयएसबीटी (उन्नत), वाशी (उन्नत), सानपाडा (उन्नत), जुईनगर (उन्नत), एलपी (उन्नत), नेरूळ स्थानक (उन्नत), सीवूडस स्थानक (उन्नत), अपोलो (उन्नत), सागर संगम (उन्नत), तारघर (उन्नत), नवी मुंबई विमानतळ पश्चिम (उन्नत) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २ (उन्नत)
या मार्गिकांशी जोडणी
मेट्रो ८ मार्गिका मेट्रो ७, ७ अ (दहिसर-गुंदवली-मुंबई विमानतळ), मेट्रो ३ (कुलाब-वांद्रे-सीप्झ-आरे) मेट्रो मार्गिकांशी टी २ मेट्रो स्थानक येथून जोडली जाणार आहे. तर मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गिकेशी गरोडीया नगर स्थानक येथून जोडली जाणार आहे. मेट्रो १(वर्सोवा-घाटकोपर) मार्गिकेशी मेट्रो ८ मार्गिका सागर संगम स्थानक येथून, मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेशी एस.जी, बर्वे मेट्रो स्थानक येथून जोडली जाणार आहे. त्याचवेळी कुर्ला रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसही मेट्रो ८ मार्गिकेने जोडले जाणार आहे.