मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभाग परिमंडळ – ३ च्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठे यश मिळवले असून, या कारवाईत थायलंडहून तस्करी करून आणलेला २४ किलो ९६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे २४ कोटी ६६ लाख रुपये असून या प्रकरणी दोन प्रवासी आणि त्यांच्याकडून गांजा स्वीकारणारा व्यक्ती अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.

बँकॉकहून काही संशयीत व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी थांबवले आणि त्यांच्या सामानाची तपासणी केली. त्यांच्या सामानात व्हॅक्युम-पॅक पद्धतीने लपवून ठेवलेला हिरव्या रंगाची पाने सापडली. तपासणीत तो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तात्काळ राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तस्करी केलेला गांजा स्वीकारण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्याना मिळाली आहेत. मोबाइलमधील संभाषण व संदेशांद्वारे आरोपींची नावे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना मिळाली आहेत. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या संपूर्ण टोळीशी संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी त्याचे जगभरात वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉकमार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे – येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांत १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.