मुंबई : प्रकाशाचा सण असलेल्या दीपावलीमध्ये नागरिक कर्णकर्कश आवाज करणारे फटाके फोडतात. या फटाक्यांमुळे वृद्ध नागरिक व लहान मुलांप्रमाणेच प्राणी व पक्ष्यांनाही प्रचंड त्रास होतो. फटाक्यांच्या आवाजाने अनेक प्राणी सैरावैरा धावू लागतात. यातून ते जखमी होण्याच्या घटना घडतात. यंदा दिवाळीमध्ये ‘फटाके कमी फोडा किंवा अजिबात फोडू नका, असे आवाहन विविध प्राणी व पक्षी मित्र संघटनांकडून करण्यात आले आहे.
श्वान व मांजरी यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा सहा ते सात पट अधिक असते. त्यामुळे एखादा फटाका फुटला की त्याचा आवाज हा त्यांच्या दृष्टीने कर्णकर्कश व असह्य असल्याने ते रस्त्यावर घाबरून सैरावैरा पळू लागतात. यामुळे ते अनेकदा गाडी खाली येऊन जखमी होतात किंवा कायमचे बहिरे होतात. तसेच प्राणी कायमचे अपंग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या धुरांचा त्रास प्राणी व पक्ष्यांना अधिक होतो. अनेकदा धुरामुळे पक्षांना श्वास घेण्याचा त्रास होऊन ते खाली पडून जखमी होतात. दरवर्षी दिवाळीमध्ये ४० ते ५० प्राणी व पक्षी हे धुरामुळे किंवा फटाक्यांच्या आवाजाने जखमी होतात. गतवर्षी दिवाळीच्या चार दिवसांमध्ये ३१ प्राणी व पक्षी जखमी झाले होते. यामध्ये १५ कबुतरे, सहा घारी, दोन घुबड आणि आठ श्वानांचा समावेश होता. त्यामुळे दिवाळी प्राणी व पक्ष्यांच्या जीवावर बेतू नये यासाठी नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरा करण्याचे आवाहन प्राणी व पक्षी मित्रांकडून करण्यात आले आहे.
पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी
फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव प्राणी हे घरामध्ये पलंग, टेबल, खूर्चीखाली लपून बसतात. यातूनच अनेकदा काही प्राणी घराबाहेर पळ काढतात. घराबाहे पळणारे प्राणी हरवण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात नाव व मालकाचा मोबाइल क्रमांक असलेले टॅग लावण्यात यावे. तसेच त्यांना घरात सुरक्षित ठेवा, बाहेरील आवाजांपासून दूर ठेवा, शांत कोपरा तयार करा आणि हलके संगीत लावा. शक्य असल्यास त्यांच्या जवळ राहा व खेळणी किंवा खाद्य देऊन त्यांना फटाक्यांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असेही प्राणी मित्रांकडून सांगण्यात आले.
नागरिकांना आवाहन
फटाक्यांमुळे घाबरलेल्या प्राण्यांना त्रास देऊ नका. त्यांना अंगणात किंवा गॅरेजमध्ये आसरा द्या, पाणी व अन्न द्या. पक्ष्यांच्या खाद्य क्षेत्राजवळ, घरट्यांच्या झाडाखाली किंवा राष्ट्रीय उद्यानांच्या परिसरात फटाके फोडणे टाळा. फटाक्यांच्या अवशेषामध्ये विषारी घटक असल्याने फटाके फोडल्यानंतर ते तातडीने साफ करावेत, जेणेकरून प्राण्यांना विषबाधा होणार नाही, असे आवाहन इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर एनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाऊंडेशन (एसीएफ) आणि प्लाण्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज-मुंबई) या संस्थांनी केले आहे.