मुंबई : मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे – कुर्ला संकुल परिसरात जून महिन्यात तब्बल ४१ अजगरांची सुटका करण्यात आली. दरम्यान, गेल्या काही वर्षांत येथील इमारतींमधील कार्यालयात साप दृष्टीस पडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वांद्रे – कुर्ला संकुल परिसरात अजगरांचा वावर असल्याच्या तक्रारी कार्यालयात फोनवरून संपर्क साधून करण्यात येत होत्या. यासंदर्भातील पहिली तक्रार ४ जून रोजी करण्यात आली होती. एका कार्यालयातील बैठकीच्या दालनातील वातानुकूलित यंत्रणेच्या डक्टमधून अजगर आढळला होता. घटनेची माहिती मिळताच संस्थेचे पथक तेथे पोहोचले आणि अजगराची सुटका केली. या परिसरात अधूनमधून अजगर दृष्टीस पडत होते. मात्र यंदा जूनमध्ये अजगर दिसण्याचे प्रमाण वाढले होते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

मिठी नदी परिसरातील एका इमारतीच्या आवारात २५ जून रोजी १० अजगर सापडले होते. पथकाने त्यांना जंगलात सोडले. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये आणखी काही अजगर आणि त्यांच्या पिल्लांनाही जीवदान देण्यात आले, अशी माहिती प्राणी संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली.

दरम्यान, वांद्रे कुर्ला संकुल परिसरात अजगर दिसणे किंवा असणे ही सामान्य बाब आहे. मात्र, सध्या या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे त्यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते आपल्या दृष्टीस पडू लागले आहेत. पावसाचे दिवस असल्याने जागा उपलब्ध असेल तिथे ते अंडी घालतात, असे रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअरचे (रॉ) संचालक पवन शर्मा यांनी सांगितले.

दरम्यान, अजगर बिनविषारी साप आहे. पावसाळा त्यांचा अंडी उबविण्यचा काळ आहे. ते पावसाळ्यात सांडपाण्याच्या वाहिन्यांमध्ये आश्रय घेतात. जिथे त्यांना अनुकूल वातावरण मिळते. जूनमध्ये अजगराबरोबरच नाग, घोणस आणि नानेटी या सापांच्या प्रजातींना देखील जीवदान दिले होते.

यापूर्वी नाल्यात अजगराची अंडी सापडली

मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावरील एका नाल्यात नऊ फूट लांबीची मादी अजगर आणि २२ अंडी सापडली होती. वन विभागाचे अधिकारी- कर्मचारी आणि रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे (रॉ) पदाधिकारी तातडीने तेथे पोहोचले. यांनी मादी अजगर, तसेच अंडी ताब्यात घेतली. दरम्यान, मादी अजगराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैद्यकीय तपासणीत ती सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मादी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मात्र, नैसर्गिक अधिवासात अंडी सोडणे शक्य नव्हते. संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात अनुकूल तापमान, आर्द्रता आणि नियमित निरीक्षणाखाली दोन महिने यशस्वीरित्या अंडी उबवण्यात आली. काही दिवसांपूर्वी अजगराची २२ पिल्ले अंड्यांतून बाहेर आली. ही सर्व पिल्ले निरोगी असल्याने त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.