मुंबई : विविध स्वरुपाच्या रक्त चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणारी ‘आपली चिकित्सा योजना’ मागील काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने १०० आरोग्य संस्थांमध्ये १ ऑगस्ट २०२५ पासून ‘आपली चिकित्सा योजना’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.
‘आपली चिकित्सा’ योजनेअंतर्गत मुंबईतील नागरिकांना आरोग्य संस्थांमध्ये बाह्यस्रोताद्वारे विविध स्वरुपाच्या रक्त चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेली ही योजना काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र मुंबई महानगरपालिका पुन्हा १ ऑगस्टपासून ही सेवा सुरू करीत आहे.
मुंबई महानगरपालिकेने या सेवेसाठी जून २०२५ मध्ये राबविलेल्या निविदा प्रक्रियेनुसार ‘लाइफनिटी हेल्थ’ या संस्थेची सेवा पुरवठादार म्हणून निवड केली आहे. ‘आपली चिकित्सा’ योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार ६६ मूलभूत तपासण्या व १७ प्रगत अशा ८३ तपासण्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच १५ ऑगस्टपर्यंत महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत मूलभूत व प्रगत तपासण्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेची उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, पॉलिक्लिनिक, प्रसूतिगृहे, तसेच विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय व जोगेश्वरी स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालयाचा त्यात समावेश आहे.
या ठिकाणी सुरू होणार सेवा
१६ उपनगरीय रुग्णालये, ३० प्रसूतिगृहे, ५ विशेष रुग्णालये, डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, एचएचबीटी ट्रॉमा रुग्णालय, विभाग ‘ए’ ते ‘ई’मधील सर्व महानगरपालिका दवाखाने येथे ’आपली चिकित्सा योजना’ सुरू करण्यात येणार आहे.
व्हॉट्स ॲपवर मिळणार रक्त चाचणी अहवाल
मुंबई महानगरपालिकेच्या धोरणांतर्गत रुग्णांना रक्त चाचणी अहवाल व्हॉट्स ॲपद्वारे उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीद्वारे (एचएमआयएस) सर्व रुग्णांच्या माहितीचे संकलन, व्यवस्थापन करण्यात येणार आहे.