मुंबई : कोणत्याही चित्रपटाच्या प्रक्रियेत प्रदर्शनाची तारीख हा महत्त्वाचा मुद्दा असतो. अनेकदा सुट्टयांचा हंगाम आणि प्रेक्षकांचा कल पाहून चित्रपट प्रदर्शित केला जातो. तर एकाच वेळी विविध चित्रपटांशी स्पर्धा टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्याचेही पाहायला मिळते. मात्र ज्या चित्रपटाचा आशय उत्तम आहे आणि सगळ्याच बाबतीत दर्जेदार आहे, तर तो चित्रपट पाहायला प्रेक्षक चित्रपटगृहात कधीही येणारच. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होत आहे, याच महिन्यात मुलांच्या शाळा सुरू होतात, मात्र लहान मुलांची कथा असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आपल्या मुलांसह चित्रपटगृहात नक्की येतील, असा विश्वास अभिनेता आमिर खान यांनी व्यक्त केला.

हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रॉडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी चित्रपट २० जून २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत असून आनंद, आत्मियता आणि हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान यांनी नुकताच पत्रकारांशी मुक्त संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘माझा ‘लगान’ हा चित्रपट १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झाला होता, तरीही ‘लगान’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एप्रिल – मे हा सुट्टीचा हंगाम सोडून जून महिन्यात चित्रपट प्रदर्शित केल्यास काहीही परिणाम होत नाही. दरवर्षी बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत असते आणि काही प्रक्रियांना वेळही लागतो, त्यामुळे नेहमी सुट्टीच्या हंगामात चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही. जेव्हा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट तयार करून पूर्ण झाला, तेव्हा आम्हाला प्रदर्शनासाठी सर्वात जवळची तारीख जून महिन्यातील मिळाली. त्यामुळे चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजित आहे’, असे आमिर खान यांनी स्पष्ट केले.