मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी, रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, रविवारी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना ब्लॉकचा सामना करावा लागणार असल्याने, ब्लॉकबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर मध्य रेल्वेने रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘लोकसत्ता’च्या बातमीमुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने, लाखोंच्या संख्येने गणेशभक्त गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात. परंतु, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला. या ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकांवरील थांबा रद्द करण्याचे नियोजन होते.
गणेशोत्सवानिमित्ताने चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकात लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परिणामी, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसह लालबाग, चिंचपोकळी, करी रोड परिसरातील गणपती दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल होण्याची चिन्हे होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करून, निद्रावस्थेत असलेल्या, गणेशभक्तांचे काही देणेघेणे नसलेल्या मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागे केले. शनिवारी दुपारच्या सुमारास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ब्लॉक रद्द केल्याची माहिती दिली केली.
मध्य रेल्वे प्रशासन गणेशोत्सव काळात ब्लॉकचे नियोजन करून, जनसंपर्क विभाग त्या ब्लॉकला प्रसिद्ध देते. यातून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना मुंबईतील गणेशोत्सव आणि भाविकांची रेलचेल याबाबत शून्य ज्ञान असल्याचे दिसून येत आहे.परंतु, गणेशभक्तांच्या गैरसोयबाबत फक्त खेद व्यक्त करून, मध्य रेल्वे प्रशासन मोकळे होते, असे मत प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वे प्रशासनामध्ये दर दोन वर्षांनी बदली होऊन येणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळे, प्रवाशांची गैरसोय होणारे निर्णय घेतले जातात. याचे प्रत्यंतर नुकताच घेतलेल्या मेगाब्लॉकच्या निर्णयातून दिसून आले. मुंबई शहरातील लालबाग-परळ कामगार वस्ती मधील मागील ६० वर्षांपासून सुरू आलेला गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी इथे भक्तांना येण्यासाठी चिंचपोकळी व करीरोड स्थानक जवळचे आहेत. परंतु, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली नसेल, म्हणजे भक्तांची गैरसोय कायम आहे. ‘लोकसत्ता’मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर, मध्य रेल्वेने ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. – लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
रविवारचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. लालबागचा राजा आणि इतर गणपती मंडळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ब्लॉक रद्द केला आहे. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे